मंत्र्याविरोधात कट – उल्फाचे 3 सदस्य अटकेत
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामचे आरोग्यमंत्री आणि भाजपचे प्रभावशाली नेते हेमंत विश्व शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. युनायटेड लिबरेशन प्रंट ऑफ आसाम (उल्फा) या उग्रवादी संघटनेच्या गटाचे उपाध्यक्ष प्रदीप गोगोई आणि त्यांच्या 2 सहकाऱयांना अटक करण्यात आली आहे.
कटासंबंधी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पावले उचलली आहेत. या कारवाईत गोगोई समवेत 3 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सोमवारी रात्री तिघांनाही अटक करण्यात आली आहे. चौकशीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती गुवाहाटीचे पोलीस आयुक्त मुन्नाप्रसाद गुप्ता यांनी दिली आहे.
चर्चेला पाठिंबा दर्शविणाऱया उल्फाच्या गटाचा प्रदीप गोगोई नेता आहे. ही संघटना 2011 पासून सरकारसोबत चर्चा करत आहे. प्रदीप आणि त्याच्या सहकाऱयांना गुवाहाटीच्या हांटीगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर यातील दोघेजण कार्बी जिल्हय़ाचे रहिवासी असल्याचे समजते. पोलिसांनी हत्येच्या कटाचा खुलासा फोन टॅपिंगच्या माध्यमातून केला आहे.
तिघांच्या विरोधात भादंविचे कलम 120 ब (गुन्हेगारी कट), 121 (सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न) समवेत विविध कलमे आणि अवैध कारवाया प्रतिबंधव अधिनियमाचे कलम 18 (दहशतवादी कृत्याचा कट) अंतर्गत अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत.









