प्रतिनिधी/ वास्को
काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी आमदार मिलिंद नाईक यांच्याविरुद्ध वासनाकांड प्रकरणी पुन्हा तोफ डागल्याने मुरगावात पुन्हा खळबळ सुरू झाली आहे. या पाश्वभूमीवर केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी यांनी शुक्रवारी संध्याकाळी प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड व माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांच्यासोबतीने आमदार मिलिंद नाईक व त्यांच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. मात्र, या भेटीत मुरगावच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली नाही. या विषयाबाबत गुप्तता बाळगण्यात आल्याने मुरगावची उमेदवारी माजीमंत्री मिलिंद नाईक यांनाच दिली जाऊ शकते असे पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटू लागलेले आहे.
मुरगाव मतदारसंघात सध्या वासनाकांडाचे सावट पसरलेले आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी पुन्हा एकदा वासनाकांड प्रकरणाचा अधिक पर्दाफाश करताना काही अन्य पुरावेही जाहीर केल्याने मुरगाव पुन्हा खळबळ आणि चर्चा सुरू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी संध्याकाळी भाजपाचे गोवा प्रभारी तसेच केंद्रीय पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी यांनी आमदार मिलिंद नाईक व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बोगदा येथील निवासस्थानी भेट घेतली व त्यांच्याशी चर्चाही केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड व ऍड. नरेंद्र सावईकर उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकीसंबंधी बराच वेळ चर्चा झाली. मात्र, मुरगावच्या उमेदवारीबाबत कुठलीच चर्चा झाली नसल्याचे वृत्त आहे. वास्को, दाबोळी व मुरगाव भाजपाचे तसेच इतर राजकीय पक्षांचेही मुरगावच्या उमेदवारीकडे सध्या लक्ष लागून राहिलेले आहे. आमदार मिलिंद नाईक यांना वासनाकांडाच्या आरोपांमुळे मंत्रीपद गमवावे लागलेले आहे. आतापर्यंत भाजपाचीही या प्रकरणामुळे गोवाभर नाचक्की झालेली आहे. त्यामुळे पुढील बदनामी टाळण्यासाठी आमदार मिलिंद नाईक यांना यंदा उमेदवारी मिळणार नाही असे बऱयाच भाजपा कार्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटत आलेले आहे. मात्र, मुरगावात वासनाकांडाचे सावट पसरलेले असले तरी भाजपाने मिलिंद नाईक यांना उमेदवारी डावलण्याचे प्रयत्न अद्याप तरी उघडपणे दाखवलेले नाहीत. शिवाय केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी यांनी पक्षाच्या अध्यक्ष आणि संघटनमंत्र्यांसह आमदार मिलिंद नाईक व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीबाबत चर्चा करताना मुरगावच्या उमेदवारीसंबंधी एक शब्दही न काढल्याने गुंता वाढलेला आहे. उमेदवारी आमदार मिलिंद नाईक यांनाच मिळणार की पक्ष पर्यायी उमेदवार शोधणार आहे याबाबत कार्यकर्तेही संभ्रमात पडलेले आहेत. काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिलिंद नाईक यांनाच मिळण्याची शक्यता वाटू लागलेली आहे.
या बैठकीनंतर वास्कोतील हॉटेल एच.क्यू.मध्येही वास्कोतील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी व पदाधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीतही निवडणुकीसंदर्भात चर्चा व मार्गदर्शन झाले. या बैठकीला कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते.









