वार्ताहर / कणकवली:
माजी आमदार राजन तेली यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांचा संघटनात्मक कामाचा असलेला अनुभव व प्रशासन, अधिकाऱयांकडून काम करून घेण्याची असलेली हातोटी यामुळे तेली हे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण करतील. जिल्हय़ातील मच्छीमार, शेतकऱयांच्या प्रश्नांची त्यांना माहिती असल्याने ते प्रश्नही मार्गी लावण्यासाठी काम करतील. भाजपमध्ये असलेले जुने व स्वाभिमानमधून पक्षात आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना एकत्र करत जिल्हय़ात भाजप आहे, त्याहून सक्षम करण्याचे काम तेलींच्या माध्यमातून केले जाईल, या विश्वासानेच सर्वानुमते त्यांची निवड केल्याची माहिती पक्षाचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
जिल्हा भाजपच्या अध्यक्ष निवडीसाठी येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. बैठकीला भाजपचे मावळते जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली, जि. प. अध्यक्षा समीधा नाईक, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड, प्रमोद रावराणे, आनंद सावंत, राजू राऊळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, जि. प. अध्यक्ष, आमदार, प्रदेश सरचिटणीस या पदांच्या माध्यमातून राजन तेली गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांना जिल्हय़ाचा चांगला अनुभव आहे. आमदार असताना त्यांनी सिंधुदुर्गसह कोकणातील अनेक प्रश्न विधान सभेत मांडत, त्याला वाचा फोडली. तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेत काम करण्यावर त्यांचा भर असतो. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून तेली हे जिल्हय़ात शत-प्रतीशत भाजप करतील.
निवडीनंतर तेली म्हणाले, माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने माझी पक्ष वाढीसाठी जबाबदारी अजून वाढली आहे. जिल्हय़ातील भाजपचे नेते, पदाधिकाऱयांना सोबत घेत प्रदेशस्तरावर अपेक्षित काम करणार आहे. डिसेंबरनंतर झालेल्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकीप्रमाणेच जिल्हय़ातील या पुढील सर्व निवडणुका जिंकण्यात येतील. येत्या काळात जिल्हय़ातील तीनही आमदार, खासदार, जिल्हा बँक निवडणुका टार्गेट ठेवून विजयासाठी काम करण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अपक्ष उमेदवारांसह एकूण मिळालेली मते पाहता, भाजपच जिल्हय़ात नंबर एकला आहे. जुने-नवे या सर्वांना विश्वासात घेत जिल्हाध्यक्ष म्हणून वाटचाल करण्यात येईल. त्यामुळे निवडणुकांचे पुढील सर्व निकाल भाजपच्या बाजूनेच असतील. तसेच भाजप प्रदेश सरचिटणीस पदाबाबत प्रदेशस्तरावरून निर्णय घेण्यात येईल.









