भाटपाडात रंजक लढत – ‘सभ्य माणसा’ला मतदानाचे आवाहन
पश्चिम बंगालच्या भाटपाडा येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत दिसून येत आहे. एकीकडे बैरकपूरचे भाजप खासदार अर्जुन सिंग येथे रामनवमीचे आयोजन करत आहेत. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने भाटपाडा येथे सभ्य माणसाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. बैरकपूर लोकसभा मतदारसंघात 7 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून यात भाटपाडा देखील आहे.
बैरकपूरच्या सर्व 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये अर्जुन सिंग यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते, पण भाटपाडा हा त्यांचा बालेकिल्ला आहे. अर्जुन सिंग यांचे निवासस्थान भाटपाडा येथेच असून येथूनच ते चारवेळा आमदार राहिले आहेत. तेथे आतापासूनच रामनवमीची तयारी सुरू झाली आहे. ठिकठिकाणी ‘रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा’ देणारी पोस्टर्स झळकली आहेत. भाटपाडा येथे सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
तृणमूलकडूनही पोस्टर

भाटपाडाच्या कनकीनारा भागात ठिकठिकाणी भगवान रामांची भजने ऐकू येत आहेत. संपूर्ण परिसर पोस्टरांनी झाकोळला गेला आहे. दुकानांमध्ये रामनामाच्या ध्वजपताका दिसून येत आहेत. अर्जुन सिंग यांनी स्वतःच्या समर्थकांना सर्व 7 मतदारसंघांमध्ये रामनवमीचे आयोजन करविण्यास सांगितले आहे. तर तृणमूल काँग्रेसने भाटपाडा सभ्य माणूस इच्छित आहे असा संदेश असलेली पोस्टर्स लावली आहेत.
यापूर्वी होते तृणमूलमध्ये
अर्जुन सिंग तृणमूलमधून 4 वेळा आमदार राहिले आहेत. 2019 मध्ये त्यांनी तृणमूलला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच बैरकपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यानंतर तृणमूलने अर्जुन सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्याविरोधात अवैध वित्तीय देवाणघेवाणीचा गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी त्यांच्या निवासस्थानी मागील वर्षी छापेही पडले आहेत.
अर्जुन सिंगांचे पुत्र आमदार
2016 मध्ये तृणमूलकडून अर्जुन सिंग यांनी विजय मिळविला होता. तेव्हा भाजप येथे तिसऱया क्रमांकावर राहिला होता. अर्जुन सिंग यांनी भाजपच्या वतीने लोकसभेत प्रवेश मिळविल्यावर त्यांचे पुत्र पवनकुमार सिंग यांनी येथील पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता.









