पती-पत्नीमधील वाद वाढला : सौमित्र खान यांच्याकडून घटस्फोटाची नोटीस
कोलकाता
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय लढाईने आता कौटुंबिक संघर्षाचे रुप धारण केले आहे. भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करताच परस्परांमधील कलह चव्हाटय़ावर आला आहे. सुजाता यांना घटस्फोट देण्याचा विचार आता खासदार सौमित्र यांनी चालविला आहे. त्यांनी घटस्फोटाची नोटीसही पाठविली आहे. सौमित्र हे विष्णुपूरचे खासदार असून भाजयुमोचे पदाधिकारीही आहेत. सुजाता यांनी कौटुंबिक भांडणाचा खुलासा करताना कोलकाता येथील तृणमूलच्या पत्रकार परिषदेत पक्षप्रवेश केला आहे. भाजप लोकांचा आदर करत नाही, तेथे केवळ संधीसाधू आणि भ्रष्ट लोकांची चलती असल्याचा आरोप सुजाता यांनी केला आहे. भाजपमध्ये नव्या लोकांना, निरुपयोगी आणि भ्रष्ट नेत्यांना प्रामाणिकांपेक्षा अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याचा दावा सुजाता खान यांनी केला आहे. पतीला संसदेत पोहोचविण्यासाठी मी शारीरिक हिंसाचार सहन केला, त्याग केला, परंतु तरीही मला काहीच प्राप्त झाले नसल्याने त्यांनी म्हटले आहे. सौमित्र खान मागील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते. सौमित्र हे मुकुल रॉय यांचे घनिष्ठ सहकारी मानले जातात.









