प्रतिनिधी /मडगाव
दक्षिणेतील नावेली मतदारसंघातून भाजपने यंदा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन दवर्लीचे पक्षाचे जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर यांना उमेदवारी दिली आहे. आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानताना नावेलीत भाजप कार्यकर्ताच्या पाठिंब्याने कमळ फुलविण्याचा निर्धार तुयेकर यांनी बोलून दाखविला आहे.
आपणास भाजपने सासष्टीतील दवर्ली जिल्हा पंचायत मतदारसंघ, जो नावेली विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे, तेथून दोन वेळा उमेदवारी दिली व भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीने आपण दोन्ही वेळा विजयी झालो. अशाच प्रकारे नावेलीतील भाजप कार्यकर्ते प्रथमच भाजपाला विधानसभेत नावेलीचे प्रतिनिधीत्व देण्यासाठी झटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नावेली मतदारसंघांतून तुयेकर यांच्या व्यतिरिक्त नावेली मंडळ अध्यक्ष परेश नाईक तसेच उर्फान मुल्ला व सत्यविजय नाईक यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. शेवटी पक्षाने ज्ये÷ कार्यकर्ते असलेले व दोन वेळचे जिल्हा पंचायत सदस्य तसेच यापूर्वी रूमडामळ पंचायतीचे सरपंच व उपसरपंच म्हणून काम पाहिलेले तुयेकर यांना उमेदवारी दिली आहे. नावेलीतील भाजप कार्यकर्ते एकसंध राहून विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.
नावेली मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे लुईझिन फालेरो विजयी झाले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला व पश्चिम बंगालमधून राज्यसभा खासदार झाले. त्यांची फातोर्डातील उमेदवार म्हणून पक्षाने घोषणा केली आहे. नावेलीतून तृणमूल काँग्रेसने वालांका आलेमाव यांना उमेदवारी दिली आहे. आपने प्रतिमा कुतिन्हो, काँग्रेसने आवेर्तान फुर्तादो, तर राष्ट्रवादी काँग्रेसने रेहान मुजावर यांना उमेदवारी दिली असून येथे बहुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. यातून कोणाला लॉटरी लागते ते निकाल लागल्यावर स्पष्ट होईल.









