उमेदवाराच्या पित्यावर गोळीबार : वाहनांची तोडफोड ः 5 जण गंभीर जखमी
मणिपूरमध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. राज्यात भाजप आणि नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली आहे. या संघर्षात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तर या झटापटीदरम्यान झालेल्या गोळीबरात 5 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एनपीपी उमेदवाराच्या वडिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास चालविला आहे.
मणिपूरची राजधानी इन्फाळमधील अंद्रो येथे ही घटना घडली आहे. तेथे शुक्रवारी रात्री 11 वाजता भाजप आणि एनपीपी समर्थक परस्परांना भिडले आहेत. यात सुमारे 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंसेत एनपीपी उमेदवार संजय सिंह यांचे वडिल जखमी झाले असून त्यांना गोळी लागली आहे.
उमेदवाराच्या वडिलांवर भाजप कार्यकर्त्यांनी गोळीबार केला असून त्यांच्या पत्नीलाही त्रास दिला जातोय असा दावा एनपीपीने केला आहे. तर एनपीपी कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयावर हल्ला करत जिल्हाध्यक्षांसह संयोजकाला मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे.
अशाप्रकारच्या घटनांमागे सीमेपलिकडून येणारी शस्त्रास्त्रs आणि स्फोटके कारणीभूत असल्याचे विधान मणिपूरच्या पोलीस महासंचालकांनी केले आहे. राजकीय पक्षांमधील चढाओढ या हिंसेमागील कारण असून अनेक जणांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. येथील भाग दुर्गम असल्याने पोलिसांना मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात येत नाही, यामुळे आरोपींची ओळख पटविण्यास अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे ते म्हणाले.
पोलीस महासंचालकांनी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही पक्षांच्या समर्थकांमधील झटापट रात्री 11 वाजल्यानंतर झाली आहे. तर निवडणूक नियमानुसार रात्री 9 वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारे प्रचार करता येत नसल्याचे पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे.
मणिपूरमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात सध्या भाजपचे 31 आमदार असून त्याला 4 आमदार असलेल्या एनपीएफ आणि 3 आमदार असलेल्या एनपीपीचे समर्थन प्राप्त आहे.









