ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱयाला अर्वाच्च शिवीगाळ करुन धमकी दिली आहे. याची मोबाईलमधील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, भाजपवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, आमदार कांबळे यांनी ही ऑडिओ क्लिप जूनी असल्याची प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे शिवीगाळ केल्याचे मान्य केले आहे.
आमदार कांबळेंकडून शिवीगाळ करण्यात आलेली महिला पुणे महापालिकेतील ड्रेनेज विभागात कार्यरत आहे. एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी कार्यकर्त्याच्या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असे म्हणत महिला अधिकाऱयाला धमकाविण्याचा प्रयत्न करत कांबळेंनी महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
महिला अधिकारी आणि आमदार कांबळे यांच्यात जवळपास 2 मिनिटाचे संभाषण झाले. आता त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावर आमदार कांबळे यांनी ती क्लिप जुनी असल्याची प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, या प्रकाराबद्दल आमदार कांबळेंविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.









