गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा सवाल
प्रतिनिधी/ मडगाव
‘सबका साथ सबका विकास’ हा नारा देणाऱया भाजपाला जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत फक्त एकच अल्पसंख्याक उमेदवार मिळाला काय, असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
भाजपकडून जिल्हा पंचायत निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करताना दिलेल्या जाहिरातीमध्ये वर ‘सबका साथ सबका विकास’ असे लिहिले असले, तरी त्यांच्या उमेदवारांमध्ये एकच अल्पसंख्याक उमेदवार असल्याचे आढळून आले आहे. त्यांना अल्पसंख्याक उमेदवार मिळाले नाहीत काय की, अल्पसंख्याकांना उमेदवारी द्यायची नाही असे धोरण भाजप राबवत आहे असा प्रश्न सरदेसाई यांनी उठविला आहे.
कर्नाटकातील गोहत्याबंदीमुळे गोमांसाला मुकावे लागण्याची शक्यता
कर्नाटक सरकारने बुधवारी गोहत्या बंदीसंदर्भात एक विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे फक्त गाय नव्हे, तर बैलांची हत्या करणेही शक्मय होणार नाही. हे वादग्रस्त विधेयक मंजूर करण्यास विरोध करताना विरोधी गटाने सभात्याग केला होता. दोषी आढळल्यास 7 वर्षे कारावास व 10 लाख रुपयांचा दंड अशी तरतूद त्यात करण्यात आली आहे. गोव्यात बहुतांश गोमांस कर्नाटकातून आयात होत असल्याने गोमंतकीय अल्पसंख्याक त्यांच्या मुख्य खाद्याला मुकण्याची शक्मयता निर्माण झाली आहे, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे. येत्या नाताळ सणाच्या वेळी गोमांसाच्या पदार्थांची प्लेट असण्याची शाश्वती नाही. यासंदर्भात सरकारातील वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी जनतेला काय ते सांगावे, असे त्यांनी सूचित केले आहे.
आम्ही भाजप सरकारात असताना एका साध्वीने गोव्यातील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली असता गोमांस खाणाऱयांना मारून टाकले पाहिजे असे भडकावू विधान केले होते. आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याकडे या विधानास आक्षेप घेतला होता व पर्रीकर यांनी त्यावेळी गोव्यातील शांती व सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न कोणी करू नये असे स्पष्ट केले होते. यूपी मॉडेल तेव्हा आम्ही गोव्यात राबवू दिला नव्हता. मात्र कर्नाटकाने तो राबविल्याने गोव्यावर परिणाम होणार आहेत. आम्ही टाकला तसा दबाव सध्या भाजपात उडी मारलेले काँग्रेस आमदार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टाकणार नाहीत. कारण ते मौनीबाबा आहेत. आम्ही दबाव टाकणारे व मागे हटणारे नाहीत. यामुळेच आम्हाला सरकारातून बाहेर करण्यात आले हे आता स्पष्ट होत आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.









