गिरीष चोडणकर यांचा आरोप
प्रतिनिधी /वास्को
गोव्यात आम आदमी पक्षाचे नेते येणारी विधानसभा निवडणुक नजरेसमोर ठेवून प्रसिध्दीसाठी स्टंट करू लागलेले असून वाढत्या महागाईसारख्या ज्वलंत विषयावरून लोकांचे लक्ष इतरत्र वळवून ते एक प्रकारे भाजपाला मदत करीत आहेत. आप ही भाजपाचीच बी टीम आहे अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी केली आहे.
मुरगाव काँग्रेस गट समितीला मार्गदर्शन करण्यासाठी बायणा येथे आले असता चोडणकर यांनी भाजपा आणि आम आदमी पक्षावर टीका केली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर उपस्थित होते.
भाजपाला मदत करण्यासाठीच आप नेत्यांचे नाटक
भाजपा गोव्यात काँग्रेसशी टक्कर देऊ शकत नाही. त्यामुळेच त्यांनी आप सारखी बी टीम तयार केलेली आहे. काँग्रेस आमदारांच्या भाजपा प्रवेशाचा पहिला वर्धापनदिन साजरा न करताच ते दुसरा वर्धापनदिन साजरा करीत आहेत हे आश्चर्यच आहे. केवळ निवडक आमदारांनाच त्यांनी केकसाठी निवडल्याचे दिसून आले. मगो पक्षाच्या फुटीर आमदारांचा भाजपा प्रवेश साजरा करावा असे त्यांना वाटत नाही. आपचे नेते विधानसभा निवडणुक नजरेसमोर ठेवून हे नाटक करीत आहेत. त्याव्दारे इंधन दरवाढ, इतर महागाई आणि अन्य समस्यांवरील लोकांचे लक्ष वळवून ते भाजपाला मदत करीत आहेत. भाजपाच्या विजयासाठी आप वाले काँग्रेसची मते खाण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसचे आमदार पाडून भाजपाला मदत केली होती. आपच्या उमेदवाराने प्राप्त केलेल्या 267 मतांमुळेच मुरगावची जागा काँग्रेसला गमवावी लागली होती. मात्र, यंदाची निवडणुक जवळपास अडिच हजार मतांच्या फरकाने मुरगावात काँग्रेसच जिंकेल असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.
भाजप काँग्रेसविरूध्द लढू शकत नसल्यानेच बनल्या आहेत बी टीम
गोव्यात भाजपा काँग्रेसशी एकटय़ाने लढू शकत नाही याची प्रचिती आल्यानेच भाजपा काँग्रेसविरूध्द अनेक टीम बनवत असून आप ही त्यापैकीच एक आहे. येत्या निवडणुकीसाठी काँग्रेस चाळीसही मतदारसंघात काम करीत असून युतीबाबतचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतेच घेणार आहेत. गोव्यातील काँग्रेसमध्ये यापुढे कधीच पक्षांतर होणार नाही अशी ग्वाही चोडणकर यांनी दिली. काँग्रसमधून फुटलेल्या आमदारांविरूध्द यापूर्वीच अपात्रता याचिका दाखल केलेली असून अशा फुटीरांना कधापी पक्षात घेतले जाणार नाही. आणि ज्यांना काँग्रेस पक्षाशी बोलणी करावीशी वाटते त्यांनी फुटीरांना आपल्या पक्षात घेणार नाही याची आधी खबरदारी घ्यावी. अन्यथा युती सोडाच त्यांच्याशी आमची बोलणीही होऊ शकत नाहीत असे चोडणकर म्हणाले.
चोडणकर यांच्याकडून मुरगावच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यावेळी म्हणाले की काँग्रेस पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष गिरीष चोडणकर सबंध गोव्यात फिरत असून मतदारसंघातील समस्यांबाबतही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहेत. चोडणकर यांनी मुरगाव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना येणाऱया निवडणुकांसंबंधी मार्गदर्शन केल्याची माहिती आमोणकर यांनी दिली.









