आमदार सुदिन ढवळीकर यांचा सवाल
वार्ताहर/ मडकई
बहुजन समाजाचे कैवारी म्हणवणाऱया भाजपाने याच समाजातील नगरसेवक व्यंकटेश नाईक यांना फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदावरून हटविले. भाजपाचेच नगरसेवक शांताराम कोलवेकर यांना या पदासाठी संधी का नाकारली गेली ? असा सवाल मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी उपस्थित केला आहे.
फोंडा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. बहुजन समाजातील एक प्रतिनीधी म्हणून कोलवेकर यांची नगराध्यक्षपदी निवड करावी अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. कोलवेरकर हे भाजपामध्ये असले तरी, त्यांचे भाऊ राजू कोलवेकर हे मगो पक्षाचे कट्टर समर्थक आहेत. शिवाय शांताराम यांच्याशीही आपले मैत्रीचे संबंध आहेत, असे ते म्हणाले.
नगराध्यक्षांनी आपण वैफल्यग्रस्त झाल्याचा आरोप केला. तसा कुठलाच नैतिक अधिकार त्यांना नाही. मगो पक्षाचे नेते म्हणून बहुजन समाजात आपल्याला आदर आहे. मध्यरात्री दरोडा घालून आमदार पळविणे हे भाजपाच करु शकते, अशी टिकाही त्यांनी केली.
मडकईत आपला पराभव होणार असा भाजपाचा दावा आहे. त्यावर बोलताना ढवळीकर म्हणाले, स्वत:च्या कर्तृत्वावर आपला पूर्ण विश्वास आहे. लोकसेवा हे आपले बलस्थान आहे. मडकईतील मतदार व कार्यकत्यांचा विश्वास जोपर्यंत आपल्यावर आहे, तोपर्यंत आपल्याला काळजी करण्याची गरज नाही.
माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून आमचे समाजकार्य निरंतर सुरु आहे. राजकारणात असो वा नसो आमचा न्याय्य मार्गाने जनतेसाठी लढा चालूच असेल व समाजसेवेचे व्रत कायम सुरु राहील, असेही ते पुढे म्हणाले.