रवी नाईकांनी साधला ‘मगो’वर निषाणा
प्रतिनिधी /फोंडा
भाजपाचे 20 व तिघा अपक्षांच्या पाठिंब्याने राज्यात भाजपाचे सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भाजपा सरकारच्या कुरापती काढणाऱया मगो पक्षाच्या पाठिब्यांची अजिबात गरज नाही. केंदातून निरीक्षक आल्यानंतर लवकरच भाजापाचे सरकार स्थापन होईल, अशी प्रतिक्रिया फोंडा मतदारसंघातील भाजपाचे विजयी उमेदवार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी प्रसारमध्यामांशी बोलताना दिली. रवी नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच मतदार व हितचिंतकांची खडपाबांध येथील त्यांच्या कार्यालयात रिघ लागली होती.
तिसऱया जिल्हय़ाच्या निर्मितीसाठी प्राधान्य देणार
यावेळी बोलताना त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय भाजपा कार्यकर्ते तसेच फोंडय़ातील मतदारांना दिले. आपल्याला विजयाची पूर्ण खात्री होती. येथील सुजाण मतदारांनाही फोंडय़ाचा विकास योग्य पद्धतीने कोण करु शकतो, याचे भान आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्याला पुढील पाच वर्षे काम करण्याची आणखी एकदा संधी दिली आहे. जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे, फोंडा हा तिसरा जिल्हा व्हावा यासाठी आपले प्राधान्यक्रमाने प्रयत्न असतील. केवळ फोंडा तालुकाच नव्हे तर शेजारील धारबांदोडा व इतर तालुक्यातील सामान्य जनतेला चांगल्या प्रशासकीय सेवा जवळपास मिळाव्यात यासाठी तिसरा जिल्हा होणे अत्यावश्यक आहे, असे रवी नाईक यांनी सांगितले. गोव्यातील जनतेने विचारपूर्वक मतदान करुन भाजपाला बहुमतापर्यंत पोचविले आहे. केंद्रातील मोदी सरकारचे काम पाहुनच हा कौल दिलेला आहे. केंद्र सरकारच्या मदतीशिवाय गोव्याचा भौतिक व आर्थिक विकास होणे शक्य नाही. सध्या राज्यात चौपदरी रस्ते, पूल, मोपा विमानतळ या साधन सुविधा केंद्र सरकारच्याच मदतीने उभारल्या गेल्या असून येणाऱया काळात गोव्याचा अधिक चांगल्या गतीने विकास होईल असे रवी नाईक म्हणाले.
भाजपा सरकारमध्ये येण्यास, अजून बरेच इच्छुक आहेत
नवीन सरकारमध्ये डॉ. प्रमाद सावंत हेच मुख्यमंत्री असतील असे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय फोंडय़ाला भाजपा सरकारमध्ये योग्य प्रतिनिधीत्व मिळणार आहे. मगो पक्षाने भाजपाला पाठिंबा देणारे पत्र दिले आहे, याबाबत आपल्याला कुठलीच माहिती नाही. येणाऱया काळात अजून बरेचजण भाजपा सरकारमध्ये सामील होण्यास उत्सुक असतील, अशी टिपण्णीही त्यांनी केली. तुर्त भाजपाचे 20 आणि तीन अपक्ष मिळून सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे इतरांची चिंता करण्याची गरज नाही असेही रवी नाईक म्हणाले.









