बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा, संयुक्त जनता दल व मित्रपक्षांच्या आघाडीने राजद, काँग्रेस आणि घटक पक्षांच्या महागठबंधनचे आव्हान परतविण्यात यश मिळविले असले, तरी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षाची झालेली पीछेहाट ही नव्या राजकारणाची भाजणीच म्हणावी लागेल. बिहारच्या राजकारणावर मागच्या 15 वर्षांपासून प्रामुख्याने नितीश यांचाच वरचष्मा राहिलेला असताना प्रथमच त्यांच्यावरील फोकस भाजपाकडे वळणे नि सोबतच तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाचा उदय होणे, हेच या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हटले पाहिजे. बिहार निवडणुकीत प्रारंभी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचा एकतर्फी विजय होणार असल्याची मांडणी केली जात होती. किंबहुना, तेजस्वी यादव यांच्या धडाक्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज बव्हंशी गठबंधनकडे झुकलेले पहायला मिळाले. प्रत्यक्षात मात्र निकाल एनडीएच्या बाजूने लागला आहे. त्यामागील अन्वयार्थ आता समजून घ्यायला हवा. प्रत्येक निवडणूक ही गांभीर्याने लढविणे नि त्यातून स्वपक्षाचा परीघ वाढवत नेणे, यावरच भाजपाचा नेहमी कटाक्ष असतो. बिहारमध्ये नितीश यांच्यासोबत अनेक वर्षांपासून पक्षाची युती असली, तरी हे लोढणे गळय़ात अडकवून ठेवत किती वर्षे छोटय़ा भावाच्या भूमिकेत रहायचे, यावरून भाजपात निश्चितपणे अस्वस्थता होती. तथापि, नितीश यांच्या लोकप्रियतेमुळे उघड उघड भूमिका घेणे शक्य नव्हते. परंतु, छुप्या रणनीतीने कसलेल्या राजकारण्यालाही कसा धक्का देता येतो, हे भाजपाने सोबत लढूनही नितीश यांना दाखवून दिले आहे. त्यासाठी त्यांनी लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांचा वजीर म्हणून केलेला वापर ही अफलातून खेळीच म्हणायला हवी. एका बाजूला नरेंद मोदी वा भाजपाला पाठिंबा दर्शवायचा व दुसरीकडे नितीशकुमार यांच्या विरोधात उमेदवार उभे करायचे, अशा दुहेरी नीतीतूनच चिराग यांनी संजदच्या मतपेटीला सुरूंग लावला, हे निकालातून स्पष्टपणे जाणवते. आकडेवारीच्या दृष्टीने पाहता लोक जनशक्ती पक्षाला या निवडणुकीत यश मिळाले नसेलही तरीदेखील त्यांचे उपदवमूल्य दिसल्याने दिल्लीत त्यांचे वजन वाढले, ही मोठी उपलब्धी ठरते. नितीश यांना डॅमेज करायचे, पण सत्तेची खुर्चीही निसटू द्यायची नाही, हा तसा जोखमीचाच डाव. परंतु, प्रादेशिक पक्षांच्या खच्चीकरणाच्या विडा उचललेल्या मोदी, शहांना असे डावपेच लढवायला आवडतात. या खेपेलाही त्यांच्या डावपेचांना यश मिळाल्याचे दिसते. मागील निवडणुकीत राजदच्या सहकार्याने निवडणूक लढविलेल्या संजदला 71 जागांवर यश मिळाले होते. तर विरोधी भाजपाला 53 जागा मिळाल्या होत्या. या खेपेला नेमके उलट चित्र पहायला मिळते. त्यामुळे आज ना उद्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाने दावा केला, तर आश्चर्य वाटू नये. या संदर्भात पक्षाने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी पक्षातील काही नेत्यांच्या निकालानंतरच्या प्रतिक्रिया पाहता तशी शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राचे उदाहरण त्याकरिता बोलके ठरते. म्हणूनच महाराष्ट्राप्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न बिहारमध्ये प्रतिष्ठेचा केला जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अर्थात सर्वात मोठा पक्ष ठरूनही नितीशच पुन्हा मुख्यमंत्री झाले, तरी त्यांचे नेतृत्व पूर्वीप्रमाणे कणखर वा स्थिर राहण्याची शक्यता कमीच. उलटपक्षी भाजपाचा प्रभाव अधिक राहू शकतो. आता ही झुलती खुर्ची स्वीकारायची, मित्रपक्षाला पाठबळ द्यायचे की आपल्या धक्कातंत्री राजकारणाचा अवलंब करून पुन्हा पल्टी मारायची, हे नितीश यांनाच ठरवावे लागेल. 15 वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत विकास, दारूबंदी, महिला सक्षमीकरणाच्या आघाडीवर कामे झाली असतीलही. परंतु, औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मितीत त्यांना भरीव काही करता आले नाही. त्यात त्यांना धरसोड वृत्ती नडली, असे म्हणता येईल. तसा या निवडणुकीत सर्वाधिक लाभ भाजपाचाच झाला. मोदींच्या झंझावाती सभा, तगडी प्रचारफळी या जोरावरच पक्षाने मुसंडी मारली आहे. कोरोना पर्वातही मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचेच हे द्योतक. भाजपाप्रमाणे राजदची कामगिरीही उल्लेखनीय. मतांची वाढलेली टक्केवारी पक्षाला दिलासा देणारी होय. या निवडणुकीत तेजस्वी यांनी दिलेली एकाकी झुंज त्यांच्यातील नेतृत्वगुणच दर्शवितात. हा एकटा युवक मोदी, नितीश यांच्या अजस्त्र सेनेशी दोन हात करतो, त्यांची दमछाक करतो, ही मोठी गोष्ट आहे. एकीकडे सारे दिग्गज नेते 370 वा अन्य राष्ट्रीय मुद्दय़ांवर भर देत असताना ‘बेरोजगारी’सारखा जीवनमरणाचा विषय ऐरणीवर आणून त्यांनी आपल्यातील प्रगल्भतेचे घडवलेले दर्शन ते लंबी रेस का घोडा असल्याचेच दाखवतात. म्हणूनच जय हुकून भले पराजय झाला असेल. पण, असा पराभवही बऱयाचदा तेजस्वी असतो. कदाचित काँग्रेसची समर्थ साथ लाभली असती, तर त्यांना निर्भेळ विजय मिळविता आला असता. काँग्रेसने जादा म्हणजेच 70 जागा लढविल्या खऱया. पण, कुठेही काँग्रेस लढताना दिसली नाही. राहुल गांधी यांनी वेळात वेळ काढून बिहारच्या खेळपट्टीवर टिकून राहण्याइतके मानसिक बळ दाखवायला हवे होते. मात्र, इच्छाशक्तीच नसेल, तर पक्षाच्या जागा नि विस्तार कसा होणार? डाव्यांची कामगिरीही त्यांच्यासाठी उत्साहवर्धक ठरावी. बिहारचे राजकारण कोणत्या दिशेने जाते, याला भारतीय राजकारणात फार महत्त्व राहिले आहे. गतवेळी विरोधात निकाल गेला खरा. मात्र, मोदी यांनी नितीश यांना आपल्याकडे वळवत एक राजकीय विरोध कमी केला. आता सांप्रत खेळीत नितीश यांचा शक्तिक्षय करीत त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा घालून दिल्या आहेत. भविष्यात स्वबळावर बिहार पादाक्रांत करण्याचे त्यांचे लक्ष्य असेल, हे नि:संशय. तिकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मणिपूर पोटनिवडणुकीतही बाजी मारत भाजपाने आपला सत्तेचा खुंटा अधिक बळकट केला आहे. भाजपाची ही तेजी सर्वाधिक चुरशीची निवडणूक ठरलेल्या बिहारपाठोपाठ ममता बॅनर्जी यांच्या प. बंगालमध्येही कायम राहणार का, हेच आगामी काळात पहावे लागेल.
Previous Articleकंबरडं मोडलं!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








