मुंबई / ऑनलाईन टीम
फोन टॅपिंग प्रकरणामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक गंभीर आरोप केला आहे. रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपसोबत राहण्यासाठी धमकावले होते, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत
जितेंद्र आव्हाड यांच्याक़डून करण्यात आलेल्या आरोपवर रश्मी शुक्ला काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभेतील अपक्ष आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या विभागाचे राज्यमंत्रिपद राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.