पक्षाच्या गट समित्यांनी पुकारले बंड : देवेंद्र फडणवीस आज गोव्यात,भाजप निवडणूक समितीची बैठक
प्रतिनिधी /पणजी
भाजपसमोर उमेदवारीसंदर्भात आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत 36 मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य निवडणूक समितीची पहिली बैठक आज स. 11 वा. होत असून याबैठकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज सोमवारी गोव्यात येत आहेत.
निवडणुकी अगोदरच भाजपमध्ये उमेदवारीवरून रूसवे, फुगवे वाढत आहेत. एकेका मतदारसंघात दोन ते तीन उमेदवारांची नावे पुढे येत असून उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातल्या त्यात इमानेइतबारे सेवा बजावणऱयांना डच्चू देऊन विरोधी पक्षांच्या आमदारांना पक्षात आण्ण्याचे प्रकार सुरू झाल्याने भाजपमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे.
भाजपसमोर बहुतांश मतदारसंघात संघर्षाच्या वातावरणामध्ये फुटीचे वारे सुरू झाले आहेत. साळगावात गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपच्या संपूर्ण गट समितीने पक्षाच्या धोरणाविरोधात बंड पुकारले व रविवारी महामेळाव्यात शक्तिप्रदर्शन घडविले.
साळगावात भाजपसमोर तीन गट
भाजपमधून बाहेर पडलेला हा एक गट असून दुसरा गट हा दिलीप परुळेकरांचा आहे. तिसरा गट आता गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांना घेऊन जयेश साळगावकर यांचा तिसरा गट तयार झाला आहे. यामुळे भाजपसमोर आव्हानांचे डोंगरच उभे राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक समितीची पहिली बैठक आज सोमवारी स. 11 वा. भाजपच्या कार्यालयात पणजी येथे होणार असून या बैठकीत एकंदर आढावा घेतला जाणार आहे.
निवडणूक रणनीतीवर होणार चर्चा
पहिल्याच बैठकीत निवडणुकीसंदर्भात रणनीतीवर चर्चा होईल. मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाईल. या बैठकीच्या निमित्ताने पक्षाचे गोवा प्रभारी सी.टी. रवी हे रविवारी गोव्यात पोहोचले. देवेंद्र फडणवीस हे आज सोमवारी सकाळी मुंबईहून गोव्यात पोहोचतील. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याशिवाय सतिश धोंड, विजय तेंडुलकर आदी बैठकीत उपस्थित राहतील. गेल्या निवडणुकीत भाजपने 36 मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. यावेळीदेखील भाजप 36 मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे.









