भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सीमोल्लंघन करताना राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसेंच्या प्रवेशाने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. रविवारच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी नव्हे तो भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
आजपर्यंत अनेक विषयावर भाजपने शिवसेनेला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वेळोवेळी अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी मौन पाळले होते. पालघर येथे हत्या झालेल्या साधूचा विषय, अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत विरोधकांनी केलेले आरोप, या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडे दुर्लक्ष केले. मात्र दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी भाजपचा ठाकरी भाषेत चांगलाच समाचार घेतला. तुमच्यात हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे थेट आव्हानच ठाकरे यांनी भाजपला दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपने शिवसेनेवर आरोप केले. त्याच हिंदुत्वाच्या मुद्यावरून ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून हिंदुत्व समजून घ्या, असा सल्ला भाजपच्या नेत्यांना देताना मंदिर उघडण्यासाठी आज भाजपचे नेते घंटानाद करत आहेत मात्र बाबरी पाडली गेली त्यावेळी कुठल्या बिळात लपून बसला होता असा सवाल विचारला.
भाजपच्या पेंद्रातील धोरणावरसुद्धा जोरदार टीका केली. जीएसटीची योजना फेल गेली असेल तर मोदी यांनी जनतेची माफी मागून पुन्हा जुनी करप्रणाली लागू करावी, असे स्पष्टपणे ठाकरे यांनी बोलून दाखविले. भाजपमध्ये 40 वर्ष काढल्यानंतर योग्य न्याय मिळत नसल्याने भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ‘तुम्ही इडी लावली तर मी सीडी लावेल’, असे ठणकावून सांगताना आगामी काळात भाजपच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे आव्हान खडसे यांनी दिले. त्यामुळे भविष्यात भाजपविरोधात राष्ट्रवादी प्रभावी विरोधी पक्ष म्हणून दिसू शकतो. त्यातच खडसे यांनी थेट आव्हान दिल्याने आणि भाजप किंवा इतर कोणत्याही नेतृत्वावर आक्षेप नसल्याचे सांगताना फक्त देवेंद्र फडणवीस हेच आपले टार्गेट असल्याचे खडसे यांनी अप्रत्यक्ष सांगितले. फडणवीस यांनी छळ केल्यानेच आपण भाजपचा त्याग करत असल्याचे खडसे यांनी बोलताना भाजपलाच आव्हान दिले.
शिवसेनेची गेल्या वर्षभरातील भूमिका पाहता संयमी, शांत होती. मात्र आगामी काळात ही भूमिका घेणे शिवसेनेला फायदेशीर नसल्याने शिवसेनेनेसुद्धा आता भाजपविरोधात दंड थोपटल्याचे रविवारी पहायला मिळाले. खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतो न होतो तोच दोनच दिवसांत मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार आणि ज्यांनी निवडून येताच भाजपला पाठिंबा दिला होता त्या गीता जैन यांनीसुद्धा शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतल्याने आगामी काळ भाजपसाठी कठीण असणार यात शंका नाही. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांचा केवळ फडणवीस यांच्याविरोधात राष्ट्रवादी वापर करून घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली. मग भाजपने रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जयकुमार गोरे आणि गोपीचंद पडळकर यांना का म्हणून भाजपात घेतले? फक्त पवारविरोधक म्हणूनच या नेत्यांना बळ देण्याचे काम भाजपने केले होते. या नेत्यांनी भाजपमध्ये आल्यानंतर पवारांनाच आव्हान दिले होते. ज्या पडळकर यांचा सांगली लोकसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला त्या पडळकर आणि मोहिते-पाटील यांना भाजपने विधानपरिषद आमदार केले ते केवळ पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारविरोधक आहेत म्हणूनच.
खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर मात्र आता सत्ताधारी महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे. असून आगामी काळात भाजपसमोर राष्ट्रवादी तसेच इतर पक्षातून आलेले आणि स्वत:च्या पक्षातील नाराज नेत्यांना सांभाळण्याचे आव्हान असणार आहे. लवकरच नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणुका जाहीर होतील. या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र येऊन लढणार असतील तर नवी मुंबईतील राजकारणावर पकड असणारे आणि राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या गणेश नाईक यांच्यासमोर महापालिका निवडणुकीत आव्हान असणार आहे. दुसरीकडे भाजपच्या दुसऱया नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनीसुद्धा भगवानगडावरील दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करताना मी शर्यतीत असेन. मला कोणी हात लावू शकत नाही असे बोलताना लवकरच शिवाजी पार्कवर शक्तिप्रदर्शन करण्याचे सूतोवाच केले. पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला असला तरी त्यांनी आपल्याला पक्षाने दिलेल्या वागणुकीबाबत असलेली सल बोलून दाखविली. खडसेंच्या पक्षांतरानंतर आता भाजपमध्ये पंकजा मुंडे या एकमेव ओबीसी नेत्या उरल्या आहेत. त्यांना आता आपले महत्त्व वाढविण्याची संधी आहे. आगामी काळात मुंडे या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या तर नवल वाटायला नको.
लवकरच महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सहा महिन्यात सरकार पडणार असल्याच्या वल्गना करणाऱया भाजपला सरकारने वेळोवेळी परतवून लावले. खडसे यांचे पक्षांतर आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला जशास तसे दिलेले उत्तर यानंतर भाजपसमोर आगामी काळात मोठे आव्हान असणार हे मात्र नक्की.
प्रवीण काळे








