उत्तर प्रदेशातील प्रकार
ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेत आली आहे. योगी आदित्यनाथांवर उत्तर प्रदेशच्या जनतेने विश्वस दाखवत भाजपला उत्तर प्रदेशात काम करण्याची संधी दिली आहे. या निवडणुकीत समाजवादी पार्टी तगडे आव्हान देईल असे वाटत असताना भाजपने मात्र जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम राखण्यात यश मिळविलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात निवडणुकीत मुस्लिम बांधवांनी भाजपला मतदान केलं आहे. पण एका महिलेला भाजपला मतदान केल्याने घरच्या लोकांनी तिला घरातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात एका मुस्लिम महिलेने भाजपला मतदान केल्याने तिला घरातून बाहेर काढलं आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यात एका मुस्लीम महिलेला भाजपला मतदान केलं म्हणून घरातून हाकललं आहे. उझ्मा अन्सारी असं या महिलेसचं नाव असून त्यांना तीन तलाक देण्याची धमकीही देण्यात आली आहे. त्यामुळे योगी सरकार प्रकारावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
उझ्मा यांना ११ मार्च रोजी घरातून बाहेर काढण्यात आलं. बरादरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि चौकशीही सुरू झाली आहे. आपल्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहणाऱ्या उझ्मा यांनी भाजपाला मत दिलं होतं कारण नरेंद्र मोदींच्या सरकारने तीन तलाकवर कायदेशीर बंदी घातली होती. उझ्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नाही, त्यांना चार बहिणी आहेत आणि त्यांचे वडील मजूर आहेत. महिन्यातून दोन वेळा भाजपा सरकारकडून मोफत किराणा आणि इतर अत्यावश्यक गोष्टींचं वाटप केलं जातं हे त्यांना आवडलं. त्यामुळे आपण भाजपला मतदान केल्याचं म्हटल आहे.
उझ्मा पुढे म्हणाल्या की, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घरात उझ्मा यांच्या पतीचे मामा तयब उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार येणार अशी चर्चा करत होता. त्यावेळी बोलताना उझ्मा यांनी सांगितलं की मीही योगींच्या बाजूने मत दिलं आहे. त्यानंतर संतापलेल्या तयब यांनी उझ्मा यांना तीन तलाकची धमकी दिली आणि सरकारलाच आता घटस्फोटापासून तुला वाचवायला सांग अशी धमकी दिली.