काँग्रेस प्रवेशानंतर एल्विस गोम्स यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. गोव्यातही त्याची व्याप्ती पेडणेपासून काणकोणपर्यंत आहे. या पक्षाबद्दल तळागाळातील लोकांना आस्था, आत्मियता, प्रेम आहे. अशा या पक्षात प्रवेश करताना अत्यानंद होत आहे, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे माजी राज्य निमंत्रक एल्विस गोम्स यांनी केले. भाजपाला हरविण्यासाठी आणि गोव्याच्या रक्षणासाठी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असेही ते म्हणाले.
रविवारी पणजीत आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते बोलत होते.
आम आदमी पक्ष सोडल्यानंतर सुमारे आठ महिने आपण राजकारणापासून अलिप्त राहिलो. त्या काळात गोव्याच्या राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. आपले कार्यकर्ते आणि हितचिंतकांशी सल्लामसलत केली. त्यांचे विचार ऐकून घेतले. त्यातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे गोमंतकीयांना काय हवे, काय नको, हे अद्याप अनेक राजकीय पक्षांना समजलेले नाही.
काँग्रेसने गोव्यासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. गोव्याला राज्याचा दर्जा काँग्रेसकाळातच प्राप्त झाला. अशा अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतरच काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राजकारणात उतरण्यासाठी आपण कोणतीही घाई केली नाही, असे विचार त्यांनी मांडले.
काँग्रेसवरील टीका सत्यावर आधारित
यापूर्वी आपमध्ये असताना आपण काँग्रेसवर टीकाही केली होती. त्या प्रत्येक शब्दाचे आजही आपण समर्थन करतो, कारण ती टीका सत्यावर आधारित होती. पक्षांतरांशी संबंधित होती. काँग्रेसचे दहा आमदार भाजपात गेले ते शेवटचे पक्षांतर तर गोमंतकीयांच्या पाठित खंजिर खुपसल्यासारखे होते. गोमंतकीयांचा तो विश्वासघात होता. एक गोमंतकीय या नात्याने तीच भावना आपणही व्यक्त केली होती, आणि यापुढेही बोलत राहणार, असे गोम्स यांनी स्पष्ट केले.
भाजपची सध्याची सत्ता बेकायदेशीर
सध्या गोव्यातून गोमंतकीयांनाच भूमीहिन करण्याचे प्रयत्न चालले आहेत. खोटय़ा आश्वासनांना तर मर्यादाच राहिलेली नाही. भाजपची 10 वर्षांची राजवट पाहिली. प्रारंभीची पाच वर्षे त्यांनी कायदेशीररित्या राज्य केले. सध्याची पाच वर्षे ते बेकायदेशीररित्या सत्ता उपभोगत आहेत. अशा भाजपला हरविले पाहिजे. त्यांच्या तावडीतून गोव्याचे रक्षण करायचे आहे, म्हणुनच आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे गोम्स यांनी सांगितले.
प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, युरी आलेमाव, जिल्हा अध्यक्ष ज्यो, वरद म्हार्दोळकर यांच्यासह अन्य मान्यवर आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गोम्स यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला नवी शक्ती मिळेल अशी आशा व्यक्त करून सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कामत यांच्याहस्ते पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. आल्तीन्य गोम्स यांनी सुत्रसंचालन केले.
’त्या’ ऑडिओमागे भाजपाच : चोडणकर
काँग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांच्या आवाजातील तो ऑडिओ व्हायरल करण्यामागे भाजपचा हात असल्याचा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे. त्याप्रकरणी पक्षाच्या कायदा शाखेतील तज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कृती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात भाजपाच सत्तेवर राहावी आणि काँग्रेसचा सत्यानाश व्हावा यासाठी चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे दोघेही सेटिंग करत असल्याचा आरोप सदर ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.









