ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमधील भाजप खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा सोशल मीडियावर एक पोस्ट करून केली. आसनसोल मतदारसंघातून ते लोकसभेत निवडून गेलेले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना बाबुल सुप्रियो यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘गुडबाय…. मी कोणत्याही राजकीय पक्षात जात नाहीये, टीएमसी, काँग्रेस, सीपीआय (एम) कोणीही मला बोलावलेले नाही, मी कुठेही जाणार नाही. समजाकार्य करण्यासाठी राजकारणातच असण्याच गरज नाही.’
मागील काही दिवसांपासून बाबुल सुप्रियो यांची भाजपमध्ये कमी होत चाललेली भूमिका बरेच काही सांगून जात होती. मंत्रिपदावरून हटवण्यात आल्यापासून बाबुल सुप्रियो काहीसे शांत होते. शिवाय, ते थोडे अलिप्त देखील राहात होते. त्यामुळे ते राजकीय संन्यास घेऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचे शनिवारी जाहीर केले आहे.
- माझा निर्णय ‘ते’ समजून घेतील
राजकारणापासून वेगळे झाल्यानंतरही आपले उद्देश पूर्ण करता येते, असे त्यांनी सांगितले. तसेच आपण कायम भाजपच्या विचारधारेशी बांधिल राहू असेही त्यांनी म्हटले आहे. माझा हा निर्णय ‘ते’ समजून घेतील, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले आहे.
मला केव्हाच पक्ष सोडायचा होता. बऱ्याच दिवसांपासून मनात हे घोळत होते. आता राजकारणात राहायचे नाही, असे मनाने ठरवले होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामुळे मी प्रत्येकवेळी निर्णय मागे घेतला. आता तर काही नेत्यांशी झालेले वाद उघड झाले आहेत. त्यामुळे अशा वेळी राजकारणात राहणे योग्य नसल्याचे वाटले. त्यामुळेच राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.









