ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष टोकाला जात असल्याचे दिसत आहे. भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर होत असलेल्या टिकेला शिवसेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच शिवसेनेने भाजपमध्ये सर्व उपरे भरल्याची टीका केली होती. शिवसेनेच्या या टीकेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, शंकरराव गडाख आणि अब्दुल सत्तार हे 1966चे शिवसैनिक आहेत का?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला. तुमच्या पक्षातील उपऱ्यांची संख्या आणि भाजपमधील उपऱ्यांची संख्या एकदा जनते समोर येऊ द्या, असं आव्हान देतानाच आजच्या मंत्रिमंडळात कोण आहेत? उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे काय 1966 पासूनचे शिवसैनिक आहेत काय? प्रियंका चतुर्वेदी या पदर खोवून आंदोलनात उतरणाऱ्या रणरागिणी आहेत का? उर्मिला मातोंडकर कोण आहेत? या लोकांनी कंबर कसून शिवसेनेसाठी आंदोलने केली आहेत का? मग इतरांना उपरे म्हणणं कितपत योग्य आहे? असा सवाल दरेकर यांनी केला.
..तुम्ही जम्मू काश्मीरची काळजी करू नका
यावेळी त्यांनी 370 कलमावरून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. 370 कलम हटवूनही जम्मू कश्मीरमध्ये सुधारणा होऊ शकली नाही असं संजय राऊतांचं विधान आहे. मग 370 कलम हटवल्याचा आम्हाला अभिमान आहे असं राऊत म्हणतात ते कशाच्या आधारे? 370 कलम काढलं ही चूक झाली का? तुम्ही जम्मूकाश्मीरची काळजी करू नका. अमित शहा सक्षम असल्याचेही ते म्हणाले.
Previous Articleजिल्हा बँकेसाठी पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल
Next Article बैलगाडा शर्यतीचा मार्ग पोलिसांकडून उध्वस्त








