दहा फुटीर आमदारांना राष्ट्रवादीकडून ऑफर
प्रतिनिधी / मडगाव
काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांवर सद्या अपात्रता याचिकेची टांगती तलवार आहे. या दहा आमदारांना विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली तर त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, यासाठी सद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत व त्यांना तशी ऑफर देण्यात आली आहे.
पक्षांतर केलेल्या एकूण 12 आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केलेली असून त्यावर सभापती आपला निर्णय देणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. हे आमदार अपात्र की पात्र ठरणार, याकडे सर्व गोवेकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पुन्हा काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता अंधूक बनलेली आहे. काँग्रेस पक्षाने यापूर्वीच पक्षांतर केलेल्या दहा आमदारांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहे.
चर्चिल-नेलीचे संभाषण व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव व त्यांच्या समर्थक तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीमती नेली रॉड्रिग्स या दोघांचे हल्लीच एक संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात श्रीमती नेली रॉड्रिग्स या नुवेचे आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांना राष्ट्रवादी पक्षात घ्यावे व त्यांना आगामी विधानसभेचे उमेदवारी द्यावी, अशी मागणी चर्चिल आलेमाव यांच्याकडे करत होत्या.
भाजपचे तीन आमदार राष्ट्रवादीकडे?
आमदार विल्प्रेड डिसा यांनी आपण भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याकडील संपर्क वाढविला आहे. त्याच प्रमाणे, कुंकळळीचे आमदार क्लाफास डायस यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीसाठी ऑफर दिल्याचे विधान केले आहे. त्यामुळे सासष्टीतील तीन भाजपचे आमदार विल्प्रेड डिसा, क्लाफास डायस व फिलीप नेरी रॉड्रिग्स हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारली जात नाही.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमांव यांनी देखील अनेकवेळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे समर्थन केले होते. त्यामुळे ही भाजपचीच खेळी असावी अशी शक्यता देखील राजकीय पातळीवर व्यक्त केली जात आहे.








