निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची घोषणा : भाजपचेही प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला दुहेरी आकडाही गाठता येणार नाही. भाजपने दुहेरी आकडा ओलांडल्यास आपण ट्विटर सोडू असे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांच्या या घोषणेवर भाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी प्रखर टीका केली आहे. बंगालच्या निवडणुकीनंतर देश एक निवडणूक रणनीतिकार गमाविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात पुढील वर्षाच्या प्रारंभी निवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी प्रशांत किशोर यांनाच स्वतःचे निवडणूक रणनीतिकार केले आहे. भाजप समर्थक प्रसारमाध्यमांच्या एका वर्गाकडून अतिशयोक्तीपूर्ण दाखविण्यात येणाऱया स्थितीच्या उलट पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी झगडावे लागणार असल्याचा दावा किशोर यांनी केला आहे.
भाजपकडून उपरोधिक टिप्पणी
भाजपने दुहेरी आकडा ओलांडल्यास मी ट्विटर सोडणार असल्याचे किशोर यांनी नमूद केले आहे. त्यांच्या या ट्विटच्या प्रत्युत्तरादाखल भाजप नेते विजयवर्गीय यांनी बंगालमध्ये भाजपची त्सुनामी पाहता नवे सरकार सत्तेवर आल्यावर देश एका निवडणूक रणनीतिकाराला मुकणार असल्याची उपरोधिक टिप्पणी केली आहे.
संन्यासाची तयारी करा
संजद नेते अजय आलोक यांनीही प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रशांत किशोर यांनी आता संन्यासाची तयारी करून ठेवावी. त्यांची कथा आता संपण्याच्या मार्गावर आहे. भाजप, संजद, काँग्रेस, द्रमुक या पक्षांनी हाकलल्याने किशोर यांच्याकडे आता कुठलाच मार्ग शिल्लक नाही, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पराभूत झाल्यावर आरती करून किशोर यांच्या नावाचा जप करणार नाहीत, हाकलणारच आहेत. याचमुळे पूर्वीच संन्यासाची घोषणा करून ठेवणे उत्तम, असे खोचक विधान संजद नेते अजय आलोक यांनी केले आहे.









