ऑनलाईन टीम / मुंबई :
नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी व अमित शहा यांची तानाजींशी तुलना करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आता नवीन वाद सुरु झाला आहे. महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत ‘भाजपनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी’ अशी मागणी केली आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल किडा’ या ट्विटर हँडलवरून ‘तान्हाजी’ सिनेमातील दृश्ये मॉर्फ करून शिवाजी महाराजांच्या चेहऱयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व तानाजी मालुसरे यांच्या चेहऱयावर अमित शाहा यांचा चेहरा लावून एक चित्रफित व्हायरल करण्यात आली आहे.
संभाजीराजे भोसले यांनी या प्रकरणावर ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणातात, पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. हा प्रकार अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय आहे. भाजपनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी.
तसेच आम्हां शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारने याची जबाबदारी घेतली पाहीजे. आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी पुन्हा होऊ नयेत यासाठी दक्षता घेतली पाहीजे आशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.









