कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. निवडणूक चुरशीची असल्याने भाजप आणि काँगेस हे दोन्ही पक्ष जीव तोडून प्रयत्न करीत आहेत. काही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकीही होत असून अशाच एका घटनेत पुरूलिया येथे भाजपच्या प्रचार रथावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. यात भाजपचे काही प्रचारक जखमी झाले, असा आरोप भाजपकडून मंगळवारी करण्यात आला आहे.
तृणमूलचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या जाहीर सभेनंतर हा प्रकार घडला. सभास्थानावरून परतणाऱया तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्याच भागात बसरूपी रथातून प्रचार करणाऱया भाजप कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. या दगडफेकीत रथाचा चालक जखमी झाला. तसेच काही कार्यकर्तेही घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. राज्याचे पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तृणमूल कार्यकर्त्यांना झुकते माप दिले जात आहे, असाही आरोप भाजपने केला.









