काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्याकडून स्पष्ट
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात भाजपचा पराभव करणे हे समान ध्येय असणाऱया कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याची वा स्वीकारण्याची काँग्रेसची तयारी आहे, असे काँग्रेसचे गोवा निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचीही उपस्थिती होती. काँग्रेस स्वबळावर भाजपला पराभूत करू शकते, तरीही एखादा पत्र पाठिंबा देण्याची तयारी दर्शवत असेल तर पक्ष नाही म्हणणार नाही, असे ते म्हणाले. आम्ही यापूर्वीच गोवा फॉरवर्डशी युती केली असून जागा वाटप लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेस आपला जाहीरनामा तयार होईल, असेही चिदंबरम म्हणाले. गोव्यातील लोकांना बदल हवा आहे आणि काँग्रेस पक्षच तो बदल देऊन एक स्थिर सरकार देऊ शकतो, असे चिदंबरम पुढे म्हणाले. निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करेल का? असे विचारता सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर पूर्ण चर्चेअंती मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणे योग्य ठरेल, तरीही त्यासंबंधी घोषणा करणे योग्य की अयोग्य त्यावरही निर्णय घेण्यात येईल, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले









