मुंबई / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यांनी कोविडची लढाई लढावी. तसेच देशाचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करीत आहेत. पण निदान मुंबईतील भाजपच्या नाच्यांनी त्यांना तरी अपशकून करू नये, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजप नेत्यांवर टीका केली आहे.
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरवात झाली असून परिणामी रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादले आहे. या निर्बंधवर काही भाजप नेत्यांनी आक्षेप घेऊन शिवसेनेवर आणि आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्यातील भाजप नेत्यांच्या टिकेला शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून उत्तर दिले आहे. ‘अमेरिकेसारख्या देशात कोरोनाचा विस्फोट होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणाखाली आहे. भाजपशासित राज्यामध्ये गंगेतील वाहत्या प्रवाहात कोरोनाग्रस्तांचे मृतदेह वाहताना जगाने पाहिले. गुजरातसारख्या राज्यात स्मशानात दोन दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारनं शर्थ करून असे विदारक चित्र घडू दिले नाही, असे शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे.