प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा रविवार दि. 6 फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या घोषित करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे दुपारी 12 वा. त्याचे प्रकाशन करणार आहेत.
भाजपचा जाहीरनामा जनताभिमुख असून तळा – गाळातील लोकांच्या सूचना, तक्रारी, गाऱहाणी विचारात घेऊन त्यांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. त्यासाठी संकल्प पेटी सर्व मतदारसंघातून फिरविण्यात आली होती. त्या पेटीत गावागावातील लोकांनी आपल्या सूचना लिहून टाकल्या होत्या. त्याचा प्रामुख्याने विचार करुन हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
विकसनशील व सोनेरी गोव्याचे भवितव्य त्या जाहीरनाम्यातून ठेवण्यात आले आहे. हा जाहीरनामा म्हणजे वचननामा असून भाजप सरकार स्थापन होताच जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्ती करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. मागील निवडणुकीतील बहुतेक आश्वासनांची भाजपने पूर्ती केल्याचे भाजपने पत्रकातून म्हटले आहे. मतदार पुन्हा एकदा भाजपला संधी देतील व भाजपचे सरकार स्थापन होईल, असा दावा भाजपतर्फे करण्यात आला आहे.









