नवी दिल्ली/प्रतिनिधी
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर आम आदमी पक्षाची तिरंगा यात्रा निघणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या उपस्थितीत अयोध्येत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी अयोध्येत ही तिरंगा यात्रा काढून राष्ट्रवादाचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच काम केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अयोध्येत ‘आप’कडून काढण्यात येणारी तिरंगा यात्रा राम मंदिरासमोर हनुमानगढी इथे थांबणार आहे. प्रदेशाध्यक्ष सभाजित सिंह म्हणाले की, ही तिरंगा यात्रा “येत्या २९ ऑगस्टला आग्रा, १ सप्टेंबरला नोएडा तर १४ सप्टेंबरला अयोध्येत काढण्यात येणार आहे. या सर्व तिरंगा यात्रांमध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह सहभागी असणार आहेत. या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आम्ही खऱ्या राष्ट्रवादाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. ते म्हणाले की, सध्याच्या भाजप सरकारने फक्त द्वेष पसरवण्यासाठी आणि लोकांची आपापसात भांडणं लावण्यासाठी जाती-धर्माचं राजकारण केलं आहे.”
दरम्यान, आम आदमी पार्टी (आप) चे प्रदेशाध्यक्ष सभाजित सिंह यांनी तिरंगा यंत्रेसंदर्भात माहिती दिली आहे. “स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘आप’ने लखनऊमध्ये हजारो लोकांसह तिरंगा यात्रा काढली होती. या यात्रेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आता पक्ष राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये तिरंगा यात्रा काढून त्या माध्यमातून राष्ट्रवादाचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे.