प्रतिनिधी/ पणजी
सरकारने जिवरक्षकांना अनेक आश्वासने दिली होती परंतु ही आश्वासने सरकार पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याने हे जिवरक्षक अनेक दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलन करत आहे. असे असूनही सरकारला त्यांचे काहीच पडलेले नाही, त्यामुळे हे सरकार कीती प्रमाणात सामान्य लोकांच्याप्रति असंवेदनशील आहे हे दिसून येते. गोवा प्रोग्रेसिव्ह प्रंटचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असणार आहे. तसेच आमच्यासोबत गोव्यातील लोक देखील या जिवरक्षकांसोबत आहे. असे गोवा प्रोग्रेसिव्ह प्रंटचे महेश म्हांबरे यांनी पत्रकारांना संबोधताना सांगितले.
गोवा प्रोगेसिव्ह प्रंटतर्फे जिवरक्षकांना पाठींबा देण्याहेतु महेश म्हांबरे व ऍड. ह्दयनाथ शिरोडकर यांनी आझाद मैदान येथील जिवरक्षकांची भेट घेतली. त्यांच्या समस्या व मागणी जाणून घेतल्या. यादरम्यान महेश म्हांबरे यांनी पत्रकारांशी संबोधताना माहीती दिली.
सरकार आपण गरीबांचे व सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे नेहमी सांगत आले आहे पण अशी चिन्हे सरकारच्या कृत्यावरुन दिसत नाही. श्रीमंताना अधिक श्रीमंत करणे व गरीबांना अधिक गरीब करणे हे या सरकारचे धोरण आहे. एवढे दिवस हे जिवरक्षक येथे आंदोलनाला बसले आहे तरी सरकारतर्फे कुणीच येथे येऊन त्यांची साधी विचारपूस देखील केली नाही. असे म्हांबरे यांनी पुढे सांगितले.
शनिवारी जिल्हा पंचायतच्या निवडणूका आहेत. अशावेळी लोकांनी सर्व विचार करुन मतदान करावे. मेळावली, मोले, म्हादई, खाण याविषयी लोकांनी विचार करावा व नंतरच मतदान करावे. मुख्यमंत्री निवडणूक आली की धडपड करतात, खाण सुरु करण्याचे खोटे आश्वासने देतात. लोकांना गाजर दाखविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. अशा आमिषांना लोकांनी बळू पडे नये. व सरकारला त्याची जागा दाखवून द्यावे. असे आवाहन म्हांबरे यांनी यावेळी केले.









