प्रतिनिधी / फोंडा
मडकई येथील श्री नवदुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष मधुकर पोकू नाईक (71) यांचे काल मंगळवारी सकाळी 7 वा. सुमारास हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच दिवशी दुपारी 12.30 वा. महालवाडा येथील स्थनिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते भाजपाचे प्रवक्ता दत्तप्रसाद नाईक यांचे वडील तसेच बाल भवनच्या अध्यक्ष शितल नाईक यांचे सासरे होत. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी दुःख व्यक्त केले आहे.
गेल्या महिन्याभरापासून ते आजारी होते. त्याच्यांवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर आजारातून सावरत असताना सोमवारी रात्री त्यांना छातीत त्रास होऊ लागल्याने बांबोळी येथे गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सकाळी त्याची प्राणज्योत मावळली. त्याच्या पश्चात पुत्र दत्तप्रसाद, दोन कन्या, जावई नातवंडे असा परिवार आहे. अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटनमंत्री सतीश धेंड, सिद्धार्थ कुंकळयेकर, आमदार सुभाष शिरोडकर, आमदार रवी नाईक, भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, माजी अध्यक्ष अनिल होबळे उपस्थित होते.









