राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी नवी दिल्लीत होणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी शनिवारी दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाषणाने ही बैठक सुरू होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने बैठकीचा समारोप होईल. आगामी 5 राज्यांमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकांबाबत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विशेष चर्चा होणार आहे. या बैठकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर विशेष चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी सर्व सदस्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेले नाही. दिल्लीतील एनडीएमसी केंद्रात होणाऱया राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण 124 सदस्य उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल, निर्मला सीतारामन आणि सर्व केंद्रीय मंत्री या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तथापि, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे इतर सदस्य आपापल्या राज्यांच्या कार्यालयात बसून एकत्रितपणे व्हर्च्युअल पद्धतीने कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होतील. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिंक देण्यात आली आहे.
रविवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षीय भाषणाने बैठक सुरू होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समारोपीय भाषणाने दुपारी 3 वाजता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपेल. या बैठकीत देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत विशेष ठराव मांडला जाणार आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चेनंतर हा राजकीय ठराव मंजूर करण्यात येणार आहे. तसेच श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्तावही आणण्यात येणार आहे.
कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठिकाणी मोदी सरकारच्या कारकिर्दीतील विकासकामांचा आढावा मांडणारा एक प्रोजेक्टही सादर केला जाणार आहे. या प्रोजेक्टमधून गरीब कल्याणकारी योजना, 80 कोटी लोकांना दिलेले मोफत अन्नधान्य, शेतकरी-महिलांना केलेली मदत, समाजातील प्रत्येक घटकासाठी राबविल्या गेलेल्या गरीब कल्याणकारी योजना, कोरोना प्रतिबंधक लसीकरणात घेतलेली भरारी आदी विषयांचा परामर्ष घेण्यात येणार आहे.
पाच राज्यांमधील निवडणुकाच मुख्य मुद्दा
भाजपमध्ये साधारणपणे बैठकांचा सपाटा सुरूच असतो. तथापि, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक विशेष संदर्भात बोलावली जाते. पुढील वषी पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्यात भाजपसाठी उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची आहे. यासोबतच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांवरही भाजपची नजर राहणार आहे. विशेषतः हिमाचल प्रदेशात भाजपची कामगिरी खराब झाल्याने त्यावरही चर्चा होणार असल्याचे समजते.









