पश्चिम बंगालमधील राजकारण तप्त, प्रचाराची रणधुमाळी
कोलकता / वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तप्त झाले आहे. अद्याप निवडणूक आयोगाने अधिसूचना काढलेली नसतानाही प्रचाराने रंग घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा यांनी राज्यव्यापी रथयात्रेची घोषणा केलेली असून या कार्यक्रमाला अनुमती देण्यास सत्ताधारी तृणमूल काँगेसने चालढकल चालविली आहे. भाजपच्या काही नेत्यांनी शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक काळात काही गफलती करतील अशी तक्रार आयोगाकडे केली आहे.
नड्डा यांनी राज्यात ‘परिवर्तन रथयात्रा’ आयोजित केली असून तिचा प्रारंभ विख्यात संत चैतन्य महाप्रभू यांचे जन्मस्थान असणाऱया नवद्वीप येथून होणार आहे. मात्र, जिल्हा प्रशानसनाने यात्रेला अद्याप अनुमती दिलेली नाही. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपने मात्र अनुमती मिळाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे, हा चर्चेचा विषय बनला आहे.
सभेला अनुमती
नड्डा यांच्या सभेला अनुमती देण्यात आली आहे. मात्र, यात्रेला अद्याप देण्यात आलेली नाही अशी माहिती नवद्वीप येथील पोलीस अधिकाऱयांनी दिली. यात्रेच्या सुरक्षेविषयी अद्याप चर्चा सुरू आहे, असे अधिकाऱयांनी स्पष्ट केले. राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रताप बॅनर्जी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून भाजप राज्यात पाच विविध स्थानांहून रथयात्रा काढणार असल्याचे कळविले आहे. या यात्रा आज शनिवारपासून काढल्या जाणार आहेत. यासाठी राज्यभरातून शेकडो स्थानिक भाजप नेते कोलकाता येथे आलेले आहेत. या यात्रा 6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
राजकीय शब्दयुद्ध रंगले
यात्रांना अनुमती देण्यास टाळाटाळ करून राज्य सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. मात्र, या यात्रांना अनुमती नाकारण्यात आलेली नाही, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. भाजप हेतुपुरस्सर दिशाभूल करणारा प्रचार करून जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करत असल्याचा प्रत्यारोप तृणमूल काँगेस पक्षाकडून करण्यात आला.
सभांचा झपाटा
भाजप आणि तृणमूल या दोन्ही पक्षांनी जाहीर सभांचा दणका लावला आहे. स्थानिक नेते आपापल्या कार्यक्षेत्रात सभा आणि प्रत्यक्ष गाठीभेटी यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. कार्यकर्त्यांची लगबगही सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचा दौरा केला. त्यांनी कार्यकर्त्यांना प्रचारकार्यासंबंधी सूचना केल्या.
मुख्यमंत्री बॅनर्जींनीही प्रचारास प्रारंभ केला आहे. त्यांनी प्रथम टप्प्यात मध्य आणि उत्तर बंगालमध्ये काही जाहीर सभा घेतल्या. राज्याच्या पश्चिम भागात भाजपने लोकसभा निवडणुकीत स्पृहणीय कामगिरी बजावली होती. त्यामुळे या भागासंबंधात त्या यंदा साशंक असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
आणखी नेते तृणमूल सोडणार ?
गेल्या दीड महिन्यांमध्ये तृणमूल काँगेसच्या 11 आमदारांनी आणि अनेक स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस आणि मार्क्सवादी साम्यवादी पक्षाच्या प्रत्येकी एका विद्यमान आमदारानेही भाजपचे कमळ हाती धरले आहे. आगामी काही दिवसांमध्ये तृणमूलला आणखी गळती लागणार अशी चर्चा आहे. ममता बॅनर्जी मंत्रिमंडळातील आणखी किमान तीन मंत्री नाराज असल्याचे बोलले जात असून ते कोणता निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.









