प्रतिनिधी/ चिपळूण
भाजपने आगामी नगर परिषद, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यासाठी येथे शहर व तालुक्याच्या बैठका घेण्यात आल्या असून पायाला भिंगरी बांधून पक्ष कामाला सुरूवात करा, अशा सूचना उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून विशेषत: कोरोनाच्या काळात भाजपने विविध उपक्रम राबवून व अडचणीत असलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्यापर्यंत पक्ष नेण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे, तर सध्या आगामी निवडणुका डोळय़ासमोर ठेऊन बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी शहराची मार्कंडीतील पक्ष कार्यालयात, तर तालुक्याची विवेकानंद सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. नातू यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना युवा मोर्चा, कामगार आघाडी, ओबीसी सेल, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल यांची तत्काळ कार्यकारिणी जाहीर करा, बूथ कमिटय़ा स्थापन करा, आठवडय़ातून एकदा बैठका घ्या, शहरात सातत्याने दौरा करा अशाप्रकारच्या सूचना केल्या.
तसेच महाविकास आघाडीबाबत बोलताना येथील माजी आमदार सेनेला भक्कम करणार, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाला उभारी देणार अशा घोषण करीत आहेत. त्यामुळे यापुढे त्यांचे गणित जुळणार नसून कोणताही पक्ष भक्कम होणार नाही अशी टीका केली.
यावेळी जिल्हा सचिव नागेश धाडवे, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर, शहराध्यक्ष आशिष खातू, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, कामगार आघाडीचे विनोद कदम, नगरसेविका रसिका देवळेकर, नुपूर बाचिम, जिल्हा चिटणीस वैशाली निमकर, शहर सरचिटणीस श्रीराम शिंदे, परेश चितळे, मधुकर निमकर, युवा मोर्चा अध्यक्ष सुयश पेठकर आदी उपस्थित होते.









