मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी व्यक्त केला विश्वास : काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार पुन्हा विजयी होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये घेतलेल्या मतांपेक्षा यावेळी मंगला अंगडी यांना अधिक मते मिळतील. काँग्रेस केवळ दिशाभूल करत आहे. तेव्हा मतदारांनी त्यांच्या या भूलथापांना बळी पडू नये आणि काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले आहे.
मुडलगी येथे भाजपने सभा घेऊन त्या ठिकाणी आपले शक्तिप्रदर्शन केले आहे. भाजपने आजपर्यंत मतदारांना विश्वासात घेऊन काम केले आहे. यापुढेही विश्वासानेच काम करेल, यात शंका नाही. मात्र, काँग्रेस मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. अरभावी मतदारसंघाचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनीही काँग्रेसवर टीका करत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना विजयी करा, असे आवाहन केले आहे.
मुडलगी येथे सभा घेऊन काँग्रेसवर टीका करण्यात आली. मंगला अंगडी यांनी मी तुमच्या आशीर्वादानेच आज निवडणुकीमध्ये उतरले आहे. माझ्या पतीची अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी मला मतदान करावे, असे त्यांनी सांगितले. मंत्री जगदीश शेट्टर यांनीही काँग्रेसवर टीका करत भाजप उमेदवाराला पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा, असे आवाहन केले.
यावेळी खासदार इराण्णा कडाडी, मंत्री उमेश कत्ती, भाजपचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील, उज्ज्वला बडवाण्णाचे यांच्यासह इतर आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते









