प्रतिनिधी/ बेंगळूर
मुस्लिमांना देण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यासंबंधी राज्य भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयाचे केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी समर्थन केले आहे. भाजपने कधीही धर्माधारित आरक्षणावर विश्वास ठेवलेला नाही. मुस्लिमांना धर्मावर आधारित 4 टक्के आरक्षण पूर्वीच्या सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, भाजपने व्होटबँक राजकारणासमोर न झुकता हे आरक्षण रद्द केले आहे. धर्माधारित आरक्षण देऊ नये, अशी आपली भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बागलकोट जिल्ह्यातील तेरदाळ येथे भाजपच्या जाहीर सभेला उद्देशून ते बोलत होते. काँग्रेस नेत्यांनी पक्ष सत्तेवर आल्यानंतर मुस्लिमांना पुन्हा आरक्षण देण्यासंबंधी केलेल्या विधानाबद्दल अमित शहा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांचे आरक्षण रद्द केल्यानंतर भाजप सरकारने अनुसूचित जाती-जमाती, वक्कलिग आणि लिंगायत समुदायांचे आरक्षण वाढविले आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर मुस्लिमांना पुन्हा आरक्षण देण्यासंबंधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अमित शहा म्हणाले, काँग्रेस पक्ष सत्तेवर येणारच नाही. जर सत्तेवर येण्यात यशस्वी ठरल्यास कोणत्या वर्गाचे आरक्षण रद्द करणार, लिंगायतांचे की वक्कलिगांचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस पक्षात कोण मुख्यमंत्री होणार, यावरून भांडण सुरू आहे. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. राज्यात यावेळी भाजप सत्तेवर येईल. त्यामुळे दोघांच्या भांडणाला अर्थच नाही, अशी कोपरखळीही शहा यांनी मारली.
स्वार्थाकरिता पक्षातून बाहेर पडलेल्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर व उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यामुळे पक्षाची कोणतीच हानी होणार नसून त्यांचे काँग्रेस पक्षातही काही चालणार नसल्याचे मत व्यक्त केले. भाजप केवळ राजकारण करणारा पक्ष नसून संस्कृती व देशप्रेम हे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. हुबळी येथून हेलिकॉप्टरने रबकवी त्यांचे आगमन झाले. आमदार सिद्धू सवदी यांनी स्वागत केले. व्यासपीठावर खासदार पी. सी. गद्दीगौडर, मंत्री गोविंद कारजोळ, मुरुगेश निराणी, पी. एच. पूजार, नारायण भांडगे, जगदीश गुडगुंटी, बसवराज कन्नूर, अरुण शहापूर आदी उपस्थित होते.
जमखंडी : रिव्हर्स गिअरमध्ये असलेला काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार नसला तरी मुख्यमंत्रिपदाकरिता या पक्षातील नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. हे हास्यास्पद असून कर्नाटकातील मुख्यमंत्रिपद हे भाजपलाच मिळणार असल्याचे अमित अमित शहा यांनी बागलकोट जिह्यातील रबकवी येथील जाहीर प्रचार सांगितले. भाजप सत्तेवर आल्यानंतर विणकर सन्मान योजनेंतर्गत 1.5 लाख विणकरांना लाभ झाला आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत 38 लाख गरिबांना लाभ मिळाला आहे.