कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पार्टी लढविणार आहे. यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून याबाबतचा अहवाल आजच प्रदेश कोअर कमिटीला पाठविणार आहे. येत्या दोन दिवसात पक्षाच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडून उमेदवाराची घोषणा होईल, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
छत्रपती ताराराणी चौक येथील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया झाली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या.
सुरुवातीला माणिक पाटील-चुयेकर यांची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, युवा नेते दौलत देसाई, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य महेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सचिन तोडकर यांनी मुलाखती दिल्या.