बेंगळूरमधील प्रचारसभेत राहुल गांधींचा आरोप
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील साडेतीन वर्षात भाजप सरकारने राज्यातील जनतेकडून 40 टक्के कमिशनच्या माध्यमातून लूट केली आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास तुमचा पैसा तुमच्यासाठी खर्च केला जाईल. भाजपने लुटलेला पैसा गॅरंटी योजनांच्या माध्यमातून तुमच्या खिशात टाकला जाईल. आमचे सरकार श्रीमंताचे नसून गरीब, शेतकरी आणि कामगारांचे रक्षण करणारे असेल, असे आश्वासन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिले.
रविवारी बेंगळूरच्या आनेकल येथील जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. भाजप सरकारने मागील तीन वर्षात लूट करून प्रशासकीय कार्यभार सांभाळला. जनतेने जनतेने निवडून दिले एक सरकार, प्रशासन चालविले दुसऱ्या सरकारने. आमदारांना खरेदी करून भाजपने सत्ता मिळविली. अशा सरकारला लुटीशिवाय काय ठाऊक असणार?, असा परखड प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मी राज्यात 500 कि. मी. पेक्षा अधिक अंतर पायी प्रवास केला. त्यात राज्यातील माता-भगिनी, युवक आणि पक्षाचे कार्यकर्ते सामिल झाले. समजातील द्वेष आणि हिंसा दूर करण्यासाठी मी पावले टाकली. यावेळी भेट घेतलेल्या अनेकांनी व्यथा मांडल्या. 400 रुपयांचा सिलिंडर 1100 रुपयांवर पोहोचला. पेट्रोल 70 रु. वरून 100 रु. तर डिझेल 60 वरून 90 रुपयांवर पोहोचला. नोटाबंदीमुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्त झाले. राज्यात 40 टक्के कमिशनचे सरकार असल्याचे जनतेनेच आपल्याला भारत जोडो यात्रेवेळी सांगितले. अशा सरकारने भ्रष्टाचारात जागतिक विक्रम मोडीत काढल्याचा घणाघात त्यांनी केला.
महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले असून काँग्रेसने त्यांना दिलासा देण्यासाठी 5 गॅरंटी योजना जाहीर केल्या आहेत. काँग्रेस पक्ष सत्तेवर आलेल्या पहिल्याच दिवशी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनांना मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.









