विरोधकांच्या प्रचारात खोडा घालण्याचा प्रयत्न : काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार
पणजी : पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या प्रचाराला खोडा घालण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने सोमवारी केला.
काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर आणि गोवा फॉरवर्डचे संघटनमंत्री दुर्गादास कामत यांनी सोमवारी पणजीत संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली आणि या दोन्ही युती पक्षां विरोधात सरकारी यंत्रणेचा वापर केल्यास भाजपला न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगितले.
सुनील कवठणकर म्हणाले की, भाजप नेते दहाहून अधिक समर्थकांसह प्रचार करत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आम्ही सर्व नियमांचे पालन करून प्रचार केला तरीही भाजप सरकार केवळ काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डला त्रास देत आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसला जो लोकांकडून पाठिंबा मिळत आहे तो बघून भाजप वैफल्यग्रस्त झाला आहे, म्हणूनच ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत्। असे ते म्हणाले.
काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना न्यायालयाला सामोरे जावे लागेल, असे कामत म्हणाले. मुख्यमंत्री आपल्या अधिकाराचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देत आहेत. आम्ही शांत बसणार नाही, तर भाजपच्या कृतीविरोधात दिल्ली येथील निवडणूक आयोगाला पत्र लिहू, असे कामत म्हणाले.
कामत पुढे म्हणाले की, भाजप सरकार विरोधी पक्षांवर खोटय़ा एफआयआर दाखल करू शकते आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करू शकते. “आम्हाला भाजपच्या योजना माहित आहेत, ते आम्हाला कसे त्रास देतील. पण आम्ही त्यांच्या दादागिरीविरुद्ध लढू.’’ असे कामत म्हणाले.









