केजरीवाल यांच्या घोषणांचा घेतला धसका : गोवा प्रभारी आमदार आतिशी यांचा निशाणा
प्रतिनिधी /पणजी
निवडणुकीच्या ऐन तोंडावर गोव्यातील बेरोजगारांना हजारो नोकऱयांचे आमिष दाखवणाऱया भाजपने गत 10 वर्षात किती नोकऱया दिल्या ते आधी जाहीर करावे आणि नंतरच फसवी आश्वासने द्यावी, अशा शब्दात दिल्लीच्या आमदार तथा आम आदमी पक्षाच्या गोवा प्रभारी आतिशी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्याचबरोबर गोव्यातील बेरोजगारीचे संकट फक्त भाजपच सोडवू शकते या दाव्याचा खरपूस समाचार घेताना गत 8 वर्षे हे सरकार झोपले होते का? असा सवालही आतिशी यांनी उपस्थित केला.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी वाल्मिकी नाईक यांचीही उपस्थिती होती. दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील बेरोजगारीचे संकट सोडविण्यासाठी केलेल्या घोषणेनंतर सरकार बिथरले असून आपच्या एकेका घोषणेचा मुख्यमंत्र्यांनी धसकाच घेतला आहे. त्यातूनच भाजपने दामू नाईक आणि इतरांच्या माध्यमातून तडकाफडकी पत्रकार परिषद घेऊन स्वतःची बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, मात्र त्यात ते सपशेल तोंडघशी पडले आहेत, असा दावा आतिशी यानी केला.
दामू नाईक यांनी अभ्यास करावा
भाजप जे बोलतो तो करून दाखवतो या दामू नाईक यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली. तसे असते तर प्रत्येक निवडणुकीत 10 हजार नोकऱयांचीच घोषणा का करावी लागते, असा सवाल आतिशी यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी दामू नाईक यांनी सर्व बाबींचा सखोल अभ्यास करावा. दिल्लीला केंद्राकडून निधी मिळत नाही, तर दिल्ली हे एकमेव राज्य आहे जे केवळ स्वतःच्या बजेटमधून काम करते, असेही त्या म्हणाल्या.
बेरोजगारी ही गोव्यातील प्रमुख समस्या असतानाही नोकरीची संधी उपलब्ध करण्याऐवजी प्रमोद सावंत यांनी स्वतःचे अपयश लपविण्यासाठी गोमंतकीयांना दोष देण्यावर भर दिला आहे. गोव्यातील तरुणांमध्ये कौशल्याचा अभाव आहे असे स्वतः एक मुख्यमंत्रीच सांगतात यावरून ते किती अपयशी आहेत, त्याचा पुरावा मिळतो. 2013 पासून भाजप सत्तेत आहे, एवढय़ा वर्षात युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी काय केले? असा सवाल आतिशी यांनी उपस्थित केला. यापूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच ‘देव सुद्धा गोव्याला नोकऱया देऊ शकत नाही’ असे वक्तव्य केले होते, त्याचीही आतिशी यांनी आठवण करून दिली.
दिल्लीत आप सरकारचे कौशल्य विद्यापीठ आहे. तेथे तरुणांना रोजगार देण्यात मदत करण्यात येते. त्याद्वारे आतापर्यंत सुमारे एक लाख तरुणांना नोकऱया मिळाल्या, 65 हजार नागरी संरक्षण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय घरोघरी सेवा, नवीन शाळा, रुग्णालये आणि इतर पायाभूत सुविधा यांच्या माध्यमातूनही हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील खाण संकट हे भाजप आणि काँग्रेसची गोमंतकीयांना संयुक्त देणगी आहे. त्यात आता लॉकडाऊन आणि महामारीमुळे पर्यटन उद्योगालाही फटका बसला. परिणामी दोन्हीवर अवलंबून असलेल्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. राज्यातील हजारो टॅक्सी व रिक्षाचालक, हॉटेल कर्मचारी, शटल ऑपरेटर यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. या सर्वांना दिलासा देण्यासाठी काय केले, त्याचीही माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी द्यावी, असे आव्हान आतिशी यांनी दिले आहे.









