कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अखेर भारतीय जनता पार्टीकडून माजी आमदार अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत महाडीक यांचे नाव निश्चित झाले. 2014 च्या दक्षिणच्या निवडणुकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध अमल महाडीक यांचा पुन्हा एकदा सामना पहावयास मिळणार आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरूध्द सक्षम उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न होता. माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहूल आवाडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांची नावे चर्चेत होती. सुरेश हाळवणकर यांनी नकार दिल्यानंतर शौमिका महाडिक यांचे नाव आघाडीवर होते. मात्र दोन दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची बैठक होऊन अमल महाडिक यांच्या नावावर एकमत झाले होते. मुंबईतील पक्षाच्या बैठकीत नाव घोषित करण्यात येणार होते. सोमवारी रात्री कोअर कमिटीची बैठकीत अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन अंतिम मान्यतेसाठी दिल्लीला पाठवण्यात आले.









