पश्चिम बंगाल/ प्रतिनिधी
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने दोघांकडून बँक तपशीलही मागितला आहे. ईडीने कोळसा घोटाळा प्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी ६ सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे, तर त्यांच्या पत्नीला १ सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. यांनतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार तृणमूल काँग्रेसशी लढण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करत आहे कारण ते पक्षाशी राजकीय लढाई लढू शकत नाहीत, असा आरोप त्यांनी शनिवारी केला. बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी तसंच त्यांच्या पत्नी रुजीरा यांना कथित कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावलं आहे. याच मुद्द्यावरुन ममता बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, “आमचे प्राधान्य लोकांसाठी काम करणे आहे. जेव्हा दिल्लीतील भाजप सरकार राजकारणात आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, तेव्हा ते तपास यंत्रणांचा वापर करतात. काही लोक आम्हाला सोडून गेले होते पण आता ते परत आले आहेत कारण त्यांना माहित आहे की हा पक्ष हेच त्यांचे घर आहे. कालीघाट येथे तृणमूल विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्याला संबोधित करत होत्या.
“भाजपचे मंत्री कोळसा माफियांच्या हाताशी आहेत. मी माझ्या राजकीय जीवनात असा सूडबुद्धीने चालणारा पक्ष आणि सरकार कधीच पाहिलं नाही. तुम्ही आम्हाला ईडीचा धाक दाखवल्यास, आम्ही भाजपा नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडे पुरावेही पाठवू”, असंही त्या म्हणाल्या.









