सीसीबीची कारवाई : एक किलो गांजा जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
भाग्यनगर परिसरातील एका शिक्षण संस्थेजवळ गांजा विकणाऱया जोडगोळीला सोमवारी अटक करण्यात आली आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून त्यांच्यावर सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
निखिल पाटील (वय 27, रा. भाग्यनगर), मोनीष पाटील (वय 26, रा. अनगोळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्या जवळून 1 किलो 100 ग्रॅम गांजा, दोन दुचाकी, दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.
दोन दिवसांपूर्वी सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या कर्नाटक विकास आढावा बैठकीत पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांची झाडाझडती घेतली होती. शहर व उपनगरांत सुरू असलेला मटका, जुगार, गांजा विक्रीवर आळा घालण्याची सूचना करून यासाठी आठ दिवसांची मुदत दिली होती.
बेळगाव पोलिसांनी कारवाई सुरू केली असून पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या मार्गदर्शनाखाली अमलीपदार्थांचा व्यवसाय करणाऱयांची धरपकड करण्यात येत आहे. भाग्यनगर येथील एका शिक्षण संस्थेजवळ गांजा विकताना या जोडगोळीला अटक झाली आहे.









