प्रतिनिधी /बेळगाव

भाग्यनगर पाचवा क्रॉस येथे कचराकुंडी नसल्याने समस्या, या मथळय़ाखाली दि. 15 जून रोजी ‘तरुण भारत’ने बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेऊन प्रशासनाने येथील कचरा हटवून परिसर स्वच्छ केल्यामुळे रहिवाशांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
येथील भागात कचराकुंडी नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत होते. तसेच हा कचरा दिवसेंदिवस एकाच ठिकाणी साचून राहिल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. याचबरोबर अज्ञात व्यक्तीकडून वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने समस्या निर्माण झाली होती. प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील परिसर स्वच्छ केला आहे.
तरुण भारतच्या बातमीने प्रशासनाला जाग आली असून येथील कचऱयाची विल्हेवाट लावल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच या ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी मागणीही होत आहे.









