व्हीपीकेच्या विजयी पॅनलला सहकारमंत्र्यांच्या शुभेच्छा
प्रतिनिधी / फोंडा
व्हीपीके अर्बन सहकारी पतसंस्थेवर निवडून आलेल्या सहकार परिवर्तन मंच या पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांनी सहकारमंत्री गोविंद गावडे यांची भेट घेतली. ज्या विश्वासाने भागधारकांनी हे परिवर्तन घडवून आणले आहे, तो विश्वास सार्थ ठरवून चांगली सेवा व संस्थेच्या भरभराटीसाठी प्रयत्नशिल राहा, अशा शुभेच्छा मंत्री गोविंद गावडे यांनी दिल्या.
व्हीपीकेच्या नूतन संचालक मंडळासाठी नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत सहकार परिवर्तन पॅनलचे सर्व अकराही उमेदवार मोठय़ा मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. व्हीपीके ही गोव्याच्या सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाची पतसंस्था असून राज्यभरातील लाखो भागधारकांच्या विश्वासावर ती उभी आहे. मध्यंतरी संस्थेमध्ये जे काही गैरप्रकार घडले, त्यामुळे संस्थेच्या विश्वासार्हतेला तडा गेला. जे घटक त्यासाठी कारणीभूत होते त्यांची मक्तेदारी मतदानाच्या माध्यमातून मोडून काढण्यात आली आहे. व्हीपीकेवर खऱया अर्थाने बदल घडून आला आहे. ग्राहकांमध्ये संस्थेबद्दल पुन्हा एकदा विश्वास संपादन करतानाच संस्थेला उच्च शिखरावर पोचविण्याचे आव्हान नवीन संचालक मंडळापुढे आहे, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले.
व्हीपीके संस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने बसवितानाच भागधारकांचा विश्वास संपादन करण्यासाठी नूतन संचालक मंडळ प्राधान्यक्रमाने लक्ष घालणार आहे. सरकारने संस्थेवर घातलेल्या मर्यादामागील कारणे शोधून काढीत, चुकीच्या गोष्टींमध्ये सुधारणा केली जाईल. भागधारकांच्या ठेवी सुरक्षित असून येणाऱया काळात संस्थेच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणतानाच आकर्षक योजना राबविल्या जातील, असे आनंद केरकर यांनी सांगितले. ज्या विश्वासाने भागधारकांनी सहकार परिवर्तन मंचला निवडून दिले, त्याला सार्थ उतरण्याचा नूतन संचालक मंडळाचा प्रयत्न राहील, असे ऍड. सुषमा गावडे यांनी सांगितले.
निवडणुकीचा सविस्तर निकाल
सहकार परिवर्तन मंच पॅनल – दिना बेतू बांदोडकर (7088), दुर्गादास लाडू गावडे (7017), चिराग विश्वनाथ गावडे (6990), रामा उर्फ सूर्या जयवंत गावडे (6949), हेमंत दत्ता गावडे (6936), आनंद बाबल केरकर (6663), हिरू शाणू खेडेकर (6604), सूर्यकांत पुरुषोत्तम गावडे (6553), सुषमा जानू गावडे (6814), सावित्री रामदास वेलिंगकर (6668), रोशन अंतुलो गावडे (6659).
सूर्या गावडे पॅनल – चंद्रकांत बाबया गावडे (1788), शशिकांत रामा बोरकर (1779), सुभाष शंकर गावडे (1690), सूर्या सदाशिव गावडे (1664), समीर पुंडलीक खेडेकर (1517), महेश गणेश खेडेकर (1456), रोहिदास फोंडू प्रियोळकर (1451), श्याम सदा सांगोडकर (1388), पुनम राजीव फडते (1699), रोशन चंद्रकांत गावडे (1768), पांडुरंग शंकर गावडे (1985).









