पुणे / प्रतिनिधी :
कोरोना महासाथीच्या काळात गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा कायम सुरू ठेवण्यासाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यावर राज्य शासनाने निर्बंध घातले असल्याने दुसरा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत होणाऱया या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार असून, त्यात प्रख्यात गायक जावेद अली, राकेश चौरासिया, पं. विजय घाटे, चारुदत्त आफळे अशा मान्यवर कलावंतांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्वरभास्कर’ हा विशेष कार्यक्रम महोत्सवात सादर होणार आहे.
उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, गेल्यावषी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागला. त्यामुळे गणेशोत्सवाची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा जपण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव’ हा अनोखा महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभला. यंदाच्या गणेशोत्सवावर तिसऱया लाटेचे सावट असल्याने यंदाही ऑनलाइन महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. www.bhaurangari.com या संकेतस्थळावर महोत्सवातील सर्व कार्यक्रम घरबसल्या विनामूल्य पाहता येतील.