मुंबई / ऑनलाईन टीम
भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळास भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जी घटना घडली आहे त्यामध्ये सरकारचं बीएमसीचं अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे दिसून येत आहे. या संदर्भात आता काही बोलणं योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. पण मला हे समजत नाही की आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही, यासाठी घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही सरकारच्यावतीने झाली पाहिजे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलगिरी व्यक्त करत मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.
Previous Articleट्रम्प विरोधात पुन्हा लढणार : बायडेन
Next Article कोल्हापूर : सत्यजीत पाटील शाहू शेतकरी आघाडीमध्येच








