नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अयोध्येतील रामजन्मस्थानी भव्य राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रव्यापी निधीसंकलनाला प्रारंभ करण्यात आला असून आतापर्यंत 100 कोटी रूपयांचा निधी संकलित करण्यग्नात आला आहे. ही माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे प्रमुख चंपतराय यांच्याकडून रविवारी देण्यात आली.
न्यासाच्या माध्यमातून देशव्यापी निधी संकलन अभियान 15 जानेवारीपासून हाती घेण्यात आले आहे. न्यासाचे आठ लाखांहून अधिक कार्यकर्ते देशात घरोघरी जाऊन निधी संकलन करीत असून त्यांना नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भारतातल्या सहा लाख खेडय़ांमध्ये प्रत्यक्ष जाऊन निधीसंकलनाचे हे व्यापक अभियान चालविण्यात येत आहे. सर्व शहरांमध्येही निधी संकलन करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रपतींकडूनही देणगी
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राम मंदीरासाठी स्वतःच्या व्यक्तीगत उत्पन्नातून 5 लाख 100 रूपयांची देणगी दिली आहे. या देणगीमुळे विरोधी पक्षांमधून नाराजी व्यक्त होत आहे. धर्मनिरपेक्षतेच्या संकेतांचा राष्ट्रपतींनी भंग केला असा आरोपही काहीजण करीत आहेत. मात्र, ही टीका अनाठायी असून संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी आहे, असे प्रत्युत्तर चंपतराय यांनी दिले.









