भोगावती / प्रतिनिधी
भविष्यवाणी आणि भाकीत सांगण्याच्या बहाण्याने गुंगीचा अंगारा देऊन एक तोळ्याचे दागिने लंपास करण्यात आले असल्याची घटना पुंगाव ता. राधानगरी येथे घडली असुन हा प्रकार घडल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून दवंडी देऊन सतर्कता पाळण्याचे आवाहन केले आहे. असाच प्रकार कुंभारवाडीतही घडल्याची चर्चा आहे. मात्र दोन्ही घटनांची राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झालेली नाही.
सुमारे आठ लोकांची भोंदूबाबांची टोळी भात मागण्याचा बहाणा करीत होती. एकाने दारात येऊन तुमचं चांगलं झालेलं भावकीला बघवत नाही,अ सं म्हणत म्हणतच घरात येऊन बसला. अनेक भूलथापा मारुन त्याने सुपभर तांदूळ, नारळ, अगरबत्ती, कापूर, घेतला, घराचं सोनं होईल, त्यासाठी सोनं सुपात ठेव, असं सांगून तिचा विश्वास संपादन करून घेतला. महिला घरात एकटीच असल्याने ती भामट्यांच्या भूलथापांना बळी पडली होती. त्यानंतर दुसरा भामटाही दाखल झाला.
भूक लागल्याचे भासवून दोघांनीही जेवण केले. त्यानंतर अंगारा लावून खाण्यासाठी दिला. यामुळे ती बेशुद्ध पडल्यावर अर्धा तोळ्याचे सोन्याचे डोरले व अर्धा तोळे झुबे घेऊन पसार झाले. महिला शुद्धीवर आल्यावर सुमारे चाळीस हजारांचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. असाच प्रकार कसबा तारळे जवळील कुंभारवाडीतही घडला असल्याचे समजते. मात्र या दोन्ही घटनाबाबत राधानगरी पोलीस ठाण्यात काहीही तक्रार दाखल झालेली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.