जगात अनेकदा आपत्तीनंतर लोकांना मोठय़ा संख्येत अन्यत्र स्थलांतर करावे लागते. अशा स्थितीत बेघर लोकांच्या संख्येत वाढ होते. आता इटलीचे स्थापत्यकार मारियो कुसिनेला यांनी या समस्येवर उपायासाठी असे घर तयार केले आहे, जे थेट प्रिंट होऊन उभे करत येईल. इको सस्टेनेबल घर मातीने तयार केलेले असून ते थेट नेत जमिनीवर उभे करता येते. या घराला टेल्का हाउसेस असे नाव देण्यात आले आहे.
इटलीतील स्थानिक मातीद्वारे या घरांचे तुकडे 3डी प्रिंटरद्वारे मिळविले जातात आणि त्यांना थेट जोडून उभे केले जाते. हे घर लवकर निर्माण करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. तसेच हे पर्यावरणस्नेही घर देखील आहे.
हे घर स्थापत्यकार मारियो कुसिनेला यांच्या कल्पनेतून उभे राहिले आहे आणि त्यांनी अशाप्रकारचे घर तयार करण्यासाठी माती आणि तंत्रज्ञानाची सांगड घडवून आणली आहे.

या घरांना सर्वात जुन्या सामग्रीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ देत सुंदर स्वरुप देण्यात आले आहे. हे घर सुंदर असण्यासह मजबूत देखील आहे. अशाप्रकारच्या घरांद्वारे पर्यावरणालाही लाभ होतो. स्वतःचा हा प्रकल्प 2030 पर्यंत युरोपला शून्य उत्सर्जनाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचविण्यास सहाय्यभूत असल्याचे मारियो यांचे म्हणणे आहे.
डोमप्रकारे गोल आकारातील या घरांची पहिली खेप इटलीच्या मासा लोम्बार्डामध्ये तयार झाली आहे. रेवेनानजीक थ्रीडी प्रिंटरद्वारे तयार घरांना स्थापित करण्यात आले आहे. ही घरे प्रिंट होण्यास एकूण 200 तास लागले असून एक घर 645 चौरस फूट आकाराचे आहे. हे लेयर्समध्ये तयार झालेले घर असून ते दोन टप्प्यांमध्ये निर्माण करण्यात आले आहे.
जर कुठे आपत्ती आल्यास तेथे केवळ एक प्रिंटर पाठविण्याची गरज भासेल आणि काम त्वरित सुरू होईल. काही दिवसांमध्येच लोकांना राहण्याची जागा देखील मिळणार असल्याचे मारियो यांचे म्हणणे आहे. या घरांच्या भिंती जाड असून यात पुरेसे व्हेंटेलेशन देखील आहे. यात वॉशरुम, लिव्हिंग रुम आणि खोल्यांमध्येही पुरेशी जागा आहे. वरील बाजूस प्रकाशाची पूर्ण व्यवस्था आहे.









