पर्यावरण बदल, वृक्षतोड, किनार्यालगतच्या बांधकामांचा पर्यावरणावर होतोय परिणाम
सावंतवाडी / प्रतिनिधी:-
अरबी समुद्र दिवसेंदिवस तापत आहे. पर्यावरण बदलामुळे हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे भविष्यात निसर्ग, ताऊते सारखी वादळे येतच राहणार असा इशारा ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांनी दिला आहे. केंद्राच्या पश्चिम घाट समितीचे अध्यक्ष पद भूषवलेल्या डॉक्टर गाडगीळ यांनी केरळ मध्ये आलेल्या महापुरानंतर हा महापुर मानवनिर्मित असल्याचे भाष्य केले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती राष्ट्रीय हरित लवादाने त्यानंतर एका सुनावणीच्या दरम्यान पश्चिम घाट समिती अहवाला बाबत केंद्राने अंतिम निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. मात्र अद्याप यासंदर्भात निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर गतवर्षी आलेल्या निसर्ग आणि यंदा आलेल्या ताऊते वादळा संदर्भात गाडगिळ यांनी केलेले भाष्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
डॉक्टर गाडगिळ म्हणतात अरबी समुद्र तापत आहे पर्यावरण बदलामुळे हे होत आहे मात्र याला आणखी पैलू आहेत आपण मोठ्या प्रमाणात कोळसा जाळत आहोत. त्याशिवाय किनारपट्टीची संरक्षण करणारी झाडे तोडत आहोत तसेच विकासाच्या नावाने आणि हायवे साठी वृक्षांची तोड होत आहे, तसेच किनार्याला लागून अधिकाधिक बांधकामे होत आहेत. त्यामुळे अशा वादळामुळे मोठ्या प्रमाणात हानी होत आहे भविष्यात अशी वादळे पश्चिम किनार पट्टीवर होतच राहणार आहेत यासंदर्भात आपण काहीच करू शकत नाही. अशा परिस्थितीत मोठी हानी टाळायची असेल तर किनारपट्टीवर व्यवस्थापन करण्याची गरज आहे. त्यासाठी वृक्षाची तोड थांबवली पाहिजे तसेच कांदळवनांचे देखील संरक्षण झाले पाहिजे असे मतही गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे.









